आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:23 AM2018-12-19T10:23:24+5:302018-12-19T10:24:22+5:30
अयोध्येत राममंदिर बनावे यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरात ‘हुंकार’ सभा घेतल्यानंतर आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत राममंदिर बनावे यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरात ‘हुंकार’ सभा घेतल्यानंतर आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी विविध धार्मिक स्थळांवर पूजाअर्चा, जनजागृती करण्यात येणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत ही जागरण मोहीम चालणार आहे.
५ आॅक्टोबर रोजी दिल्लीतील विश्व हिंदू परिषदेच्या मुख्यालयात संत उच्चाधिकार समितीची बैठक झाली होती. यात राममंदिर निर्मितीसाठी कशा प्रकारे जनतेमध्ये जागृती आणावी याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर राममंदिराच्या निर्मितीसाठी देशभरात संघ परिवाराच्या माध्यमातून सभांचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे जात आता विहिंपने पुढील उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २६ डिसेंबरपर्यंत नागपूरसह देशातील सर्वच ठिकाणी ‘विहिंप’तर्फे ‘संकल्प अनुष्ठान’ राबविण्यात येणार आहे. हे अनुष्ठान अगदी घराघरापासून सुरू होणार आहे. खासगी पूजार्चासोबतच कौटुंबिक, सामाजिक व सार्वजनिक पातळीवरदेखील ‘संकल्प अनुष्ठान’ आयोजित करण्यात येणार आहे. राममंदिराच्या निर्मितीसाठी यात प्रार्थना करण्यात येईल. यासोबतच विविध लोकप्रतिनिधींच्यादेखील भेटी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नियोजनानुसारच होणार आयोजन
यासंदर्भात ‘विहिंप’चे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल यांनी नियोजनानुसारच हे आयोजन होत असल्याचे स्पष्ट केले. देशात घरे, मंदिरं, मठ यांच्यासोबतच गुरुद्वारा, जैन, वाल्मिकी समाज तसेच आर्य समाजाच्या प्रार्थनास्थळांवरही ‘संकल्प अनुष्ठान’ करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.