स्वतंत्र विदर्भासाठी आता दिल्लीवर दबाव आणणार
By admin | Published: March 27, 2016 02:39 AM2016-03-27T02:39:14+5:302016-03-27T02:39:14+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता काँग्रेस व भाजपा विरोधी असलेल्या आप, बसपासह विविध पक्षांना सोबत घेऊन...
भाजप व काँग्रेस विरोधी पक्षांची घेणार साथ : श्रीहरी अणे यांनी मांडली भूमिका
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता काँग्रेस व भाजपा विरोधी असलेल्या आप, बसपासह विविध पक्षांना सोबत घेऊन दिल्लीतील केंद्र सरकारवर दबाब आणण्यात येईल, अशी माहिती विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे दिली.
टिळक पत्रकार भवन येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना त्यांनी विदर्भ आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्याची निर्मिती करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. त्यामुळे आता दिल्लीवर दबाव आणला जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र विदर्भाला समर्थन दिले आहे. बहुजन समाज पार्टीचा विदर्भाला पाठिंबा आहेच. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटाचे विदर्भाला समर्थनच आहे. याशिवाय ममता बॅनर्जी, नितीश चौधरी यांच्यासह डावे पक्ष आदी जे कुणी विदर्भाला समर्थन देऊ इच्छितात त्या सर्वांची मदत घेऊन दिल्लीतील केंद्र सरकारवर दबाब निर्माण केला जाईल. येत्या ३१ मार्च रोजी दिल्लीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात आपण सहभागी होऊ. तेव्हा विदर्भासाठी ज्यांना ज्यांना भेटता येईल, त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाला जाहीर समर्थन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाबाबत डोकं वापरणच बंद केले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी आता कुणी टाळू शकत नाही. ही मागणी केवळ भावनिक नाही. ती अस्तित्वासाठी सुद्धा नाही तर ती वस्तुस्थिती आहे. त्याची ठोस कारणे आहे, परंतु ती कारणे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना जाणून घ्यायचीच नाहीत, असेही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या विकासासाठी प्राथमिकता चुकत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील प्रश्नांना येथे प्राथमिकताच नाही. नक्षलवादसुद्धा यातूनच निर्माण झालेला आहे. पनवेलचे विमानतळ महत्त्वाचे की, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यावर उपाय महत्त्वाचा. असा प्रश्न उभा राहतो तेव्हा पनवेलचे विमानतळ अधिक महत्त्वाचे आहे, यासाठी बहुमत असते. अगोदर विदर्भाला पैसै दिले जात नव्हते. दिले तर खर्च होत नव्हते. दुसऱ्या वर्षी ते वळविले जायचे. परंतु आता तर राज्य सरकारकडे पैसे सुद्धा नाही. विदर्भाचा विकास करण्याची महाराष्ट्राची पत राहिली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होऊच शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी टिळक पत्रकार भवनचे प्रदीप मैत्र व ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जोसेफ राव यांनी आभार मानले. विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ आदी व्यासपीठावर होते.
मी निवडणूक लढणार नाही
मी यापुढे विदर्भाच्या आंदोलनात पूर्णवेळ सक्रि य राहील. विदर्भात जास्त वेळ घालवणार आहे. मी निवडणूक लढणार नाही. परंतु जे कुणी विदर्भाचे समर्थक उभे राहतील, त्यांना मदत करेल. त्यांना विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून मदत करेल. तसेच विदर्भ विरोधी उमेदवाराला पराभूत करण्याचे कामही करीत राहील.
सरकारने जनमत घ्यावे
स्वतंत्र विदर्भाबाबत सरकारने जनमताचा कौल घ्यावा. ५१ टक्के लोकांना विदर्भ नको असेल तर आम्ही ही मागणी सोडून देऊ, परंतु सरकार जनमत घ्यायला घाबरते. जनमत घेणे कठीण नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र विदर्भासाठी एक बॅलेट बॉक्स वेगळा ठेवा, असेही अॅड. अणे म्हणाले.