आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:14 PM2023-03-21T18:14:38+5:302023-03-21T18:17:07+5:30
नागपुरच्या सौंदर्यात कुठेतरी आड येतोय, म्हणूनच थेट या ठेल्यांवर कारवाई केली गेलीयं.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : नागपुरातलं वायुसेना नगर.. या भागात अनेक टपरीवाले - ठेलेवाले अनेक वर्षांपासून अपली उपजीविका करतात. कोणाची चहाची टपरी तर कोणाचा ऊसाचा ठेला.. पण सध्या नागपुरात जी२० ची धूम सुरू आहे. त्या निमित्तानं नागपूरला चकाचक केलं जातयं. त्यामुळेच की काय हे ठेले नागपुरच्या सौंदर्यात कुठेतरी आड येतायतं आणि म्हणूनच थेट या ठेल्यांवर कारवाई केली गेलीय.
उमाबाई तुमराम यांचा गेली 15 वर्ष याच भागात चहाचा ठेला होता. मुलाबरोबर त्या तो चालवत होत्या. पण अचानक महापालिकेचे कर्मचारी आले अन् त्यांनी हा ठेला जमिनदोस्त करून टाकला. जी२० मुळे नागपूर तर बदलतयं पण हातावर पोट असणाऱ्यांचं तर आशा कारवायांमुळे आयुष्यचं बदलून गेलंय. आता खायचं काय? जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. ठेला.. ज्याच्यावर पोट होतं, तोच डोळ्यासमोर जमिनदोस्त झाला. हे पाहून उमाबाईंना आपले अश्रू अनावर झाले.
असेच एक दिनेश जैस्वाल.. त्यांचा ही याच भागात 10 वर्षांपासून उसाच्या रसाचा ठेला होता. ते इथं ऊसाच्या रसाची विक्री करत होते. पण जी२० ची परिषदेमुळे सर्व वारंच फिरलं. त्यांनाही आपला अनेक वर्षांपासूनचा ठेला गमवावा लागला. केवळ ठेल्यावर कारवाईच झाली नाही तर तो पूर्णपणे नष्ट करून कचऱ्याच्या डब्यात टाकल्याप्रमाणे फेकून देण्यात आला. आमचा ठेला परत द्या अशी वारंवार विनंती आम्ही करुहनी आम्हाला लाच मागण्यात आली असल्याचा आरोप पिढीतांनी केला आहे. यावर मात्र महापालिका प्रशासनाद्वारे साहाय्य्क आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांनी आम्ही उचित कारवाई करू असे आश्वासन दिले.
नागपूरच्या सौंदर्यकरणामागे 200 कोटींच्या वर खर्च झाला असल्याची चर्चा आहे. पण हे होत असताना ज्याचं हातावर पोट आहे त्यांना मात्र नाहक भूर्दंड भरावा लागतोय. त्यामुळे एकीकडे जी २० नवी आशा निर्माण करत असताना दुसरीकडचं चित्र मात्र काही तरी वेगळचं सांगत आहे हे मात्र नक्की.