आता एकच ‘अजेंडा’, बाधित संख्या कमी करणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:30+5:302021-03-22T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २२ ते ३१ मार्चपर्यंत नागपूर शहर व परिसरात कडक निर्बंध लावताना अचानक नागपूर शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २२ ते ३१ मार्चपर्यंत नागपूर शहर व परिसरात कडक निर्बंध लावताना अचानक नागपूर शहरात वाढत असलेले रुग्ण कमी करणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आगामी काळामध्ये नागपूर महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी निश्चित कृती आराखड्यावर वाटचाल करावी, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
कालच्या बैठकीनंतर पालकमंत्री राऊत यांनी आज रविवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला तसेच पुढील काळासाठी एक ठोस कृती आराखडा राबवण्याचे निर्देश दिलेत. नागपूर शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर या उच्चभ्रू वस्तींमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असेल तर त्याचे नेमके कारण काय आहे? याचा शोध घेऊन या ठिकाणी ॲन्टिजेन टेस्टसारख्या पर्यायातून चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. शहरातील हॉटस्पॉट झालेल्या भागांमधील वैद्यकीय निरीक्षणे वाढविण्यासाठी त्यांनी सूचना केली असून 'सॅम्पल सर्व्हे' किंवा काही घरांची माहिती घेऊन उच्चभ्रू वस्तीमध्ये वाढत असलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नागपूर शहरामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीप्रमाणे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटांची उपाययोजना करा, कोविड वाॅर्ड पूर्ण क्षमतेने सुरू करा, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तसेच शहरी भागातील प्रत्येक कोरोना बाधिताला या दोन्ही शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध झाले पाहिजे तसेच कोणताही रुग्ण परत जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी असे स्पष्ट केले.
असा आहे कृती आराखडा
उच्चभ्रू वस्तीतील चाचण्या वाढवा
हॉटस्पॉट भागांचे सूक्ष्म निरीक्षण
गर्दीच्या ठिकाणी ॲन्टिजेन टेस्ट
मेयो-मेडिकल खाटांचे व्यवस्थापन
होम क्वारन्टाइनवर सूक्ष्म नजर
लसीकरण दिवसाला ४० हजार
बेड-रिडन रुग्णांचे लसीकरण घरी
मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई
बाजारात कोविड प्रोटोकॉलचे पालन
खासगी रुग्णालयाच्या बिलिंगवर लक्ष
होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर आढळल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी