Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे
By नरेश डोंगरे | Published: July 26, 2024 10:36 PM2024-07-26T22:36:19+5:302024-07-26T22:36:40+5:30
Nagpur News: वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे.
- नरेश डोंगरे
नागपूर - वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे.
अलिकडे रेल्वेगाड्यांच्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाडीच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. खालच्याच नव्हे तर गाडीच्या वरच्याही भागाची सातत्याने पाहणी करता यावी, यासाठी आता रेल्वे प्रशासनाने नागपूर विभागातील १७ रेल्वे स्थानकांवरच्या एफओबी वर सोलर कॅमेरे लावले आहे. हे कॅमेरे अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणे-येणे करणाऱ्या रेल्वे गाड्यांवर नजर ठेवणार आहेत. ते गाड्यांवरील पॅन्टोग्राफच्या स्थितीचे निरीक्षण करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅक्शन पॉवर कंट्रोल रूममध्ये ते कनेक्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे गाडीच्या वरच्या भागाचे ते सातत्याने निरीक्षण नोंदवणार आहेत.
रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टममुळे धावत्या गाड्यांच्या पॅन्टोग्राफमध्ये काही अडकल्यास किंवा खराबी आल्यास या कॅमरातून ते लगेच कळणार आहे. त्यामुळे गाडी थांबवून लगेच दोष दूर करण्यास मदत होणार आहे. तातडीने दोष दूर केले जाणार असल्याने रेल्वे वाहतूकीतील व्यत्यय तातडीने दूर करण्यास मदत होणार आहे.
या स्थानकांच्या ब्रीजवर लागले कॅमेरे
हे कॅमरे नागपूर विभागातील नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, घोडाडोंगरी, बैतूल, आमला, परासिया, मुलताई, पांढुर्णा, काटोल, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांंवरील फूट ओव्हर ब्रीजवर लागले आहेत.