आता मद्यतस्करीसाठी एस.टी. बसचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:42 PM2017-11-21T22:42:07+5:302017-11-21T22:47:10+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्यतस्करी करण्याचा प्रयत्न बसवाहक, चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

Now for ST drinking Use the bus | आता मद्यतस्करीसाठी एस.टी. बसचा वापर

आता मद्यतस्करीसाठी एस.टी. बसचा वापर

Next
ठळक मुद्देनागपुरात बसवाहक, चालकाची सतर्कता५३२ बाटल्या दारू जप्त

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्यतस्करी करण्याचा प्रयत्न बसवाहक, चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दारूच्या ५३२ बाटल्या जप्त केल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यानंतर तेथील मद्यविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मद्यतस्करी करीत आहेत. प्रारंभी खासगी वाहनातून ते दारू तस्करी करायचे. आता दारूच्या तस्करीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसचाही वापर केला जातो. अशाच प्रकारे चंद्रपूरला जाणाऱ्या  एसटी बसच्या (एमएच ४०/ वाय ५५६३) छतावर मद्य तस्करांनी चार पोत्यात दारूच्या बाटल्या भरून ठेवल्या. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ही बस मोरभवन स्थानकावर उभी होती. बस चंद्रपूरला निघण्याची वेळ झाली असताना बसचालक गणेशसिंग रघुवीरसिंग बैस (वय ५७, रा.दत्तानगर) आणि सतीश बाबुराव लुथळे (वय ४१, रा. तुकूम चंद्रपूर) यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बसच्या छतावर एक नजर टाकली असता चार पोती लगेज दिसले. हे लगेच कुणाचे अशी विचारणा बसवाहक लुथळे यांनी बसमधील प्रवाशांकडे केली. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने बसचालक, वाहकांनी विभाग नियंत्रक सुशील केशवराव भुते यांच्या मार्फत सीताबर्डी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पोती खाली उतरवून तपासली असता त्यात आॅफिसर चॉईसच्या एकूण ५३२ दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्याची कंपनी किंमत १७ हजार रुपये असली तरी मद्यविक्रेत्यांनुसार ही दारू एक लाख रुपये किमतीची आहे.

रोजचाच प्रकार
दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून रोजच मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. त्यासाठी मद्यतस्करांकडून एसटी बस, खासगी बस, ट्रकसह विविध वाहनांचा वापर केला जातो. काही मद्यसम्राट आपल्या आलिशान कारमधून दारूची वाहतूक करतात. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात लाखोंची देण दिली जाते. दारूबंदी झाल्याने चंद्रपुरात ६० रुपये किमतीची दारूची बाटली १५० ते २०० रुपयाला विकली जाते. त्यामुळे मद्यतस्कर पोलिसांना महिन्याला लाखोंची देण देऊन कोट्यवधींची उलाढाल करतात.

 

Web Title: Now for ST drinking Use the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.