कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 10:27 AM2021-07-14T10:27:17+5:302021-07-14T10:29:37+5:30
Nagpur News व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील यशापयशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य भारतात पहिल्यांदाच २०० जणांवर ही चाचणी नागपुरात होणार आहे. मात्र सध्या तरी कोरोनाचे गंभीर रुग्ण नाहीत. संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही चाचणी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक पेशीमध्ये स्वविभाजनाचा, पुन्हा वाढ होण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. पेशींचे विभाजन करून शरीराचे कार्य सुरू ठेवण्यासाठी लागणारी क्षमता या पेशींमध्ये असते. यादृष्टीने आता ‘स्टेम सेल्स’ (मूल पेशी) तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये संशोधन सुरू आहे. अंधत्व, बहिरेपणा, दातांचे विकार, मेंदूच्या व्याधी, अल्झायमर, सांधेदुखी, डायबेटिस अशा अनेक आजारांवर ही थेरपी मात करते, असा दावा काही जण करीत असले तरी या उपचार पद्धतीवर अद्यापही संशोधन सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाच्या उपचारात ‘स्टेम सेल थेरपी’ चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगले निकाल दिसून आल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.
- गंभीर रुग्ण पाच दिवसात बरे झाले
कोरोना उपचारावरील ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे ‘प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर’ डॉ. निर्मल जयस्वाल यांनी सांगितले, अमेरिकेत या चाचणीचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. यात कोरोनाचे जे रुग्ण व्हेंटिलटरवर (एनआयव्ही) होते, ते रुग्ण पाच ते सहा दिवसात बरे झाल्याचे आढळून आले. यामुळे दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-दुसऱ्या टप्प्यासाठी ५० ऐवजी २००चा परवानगीचा प्रस्ताव
डॉ. जयस्वाल म्हणाले, भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यात ५० जणांवर मानवी चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. परंतु ही संख्या वाढवून २०० करण्याचा प्रस्ताव ‘डीसीजीआय’ला पाठविला आहे. मंजुरी मिळताच चाचणीला सुरुवात होईल. सध्या गंभीर लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून येत आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही मानवी चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- अशी आहे थेरपी
कोरोनाचा विषाणू शरीरातील पेशी नष्ट करतो. ‘स्टेम सेल थेरपी’मध्ये इंजेक्शनच्या स्वरूपातून रुग्णाला अशा पेशी टोचल्या जातात, ज्यामुळे कोरोना विषाणू निकामी होतो. याची प्रक्रिया ‘अॅण्टिबॉडीज कॉकटेल’सारखीच आहे. परंतु त्याच्या तुलनेत चांगले निकाल दिसून आले आहेत, असेही डॉ. जयस्वाल म्हणाले.