आता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:18+5:302021-06-16T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी जागा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी जागा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये एक अशा १० अभ्यासिका निर्माण करण्यात येणार आहे. या अभ्यासिकांचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा होईल. या प्रस्तावाला मंगळवारी मनपाच्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, यांनी या निर्णयाची माहिती दिली. बैठकीला सदस्य परिणिता फुके, संगीता गिऱ्हे, सदस्य मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे आदी उपस्थित होते.
काही झोनमध्ये आधीच अभ्यासिका आहे. परंतु त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे जुन्या अभ्यासिकांची दुरुस्ती करून आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त मनपाच्या बंद असलेल्या इमारतीमध्ये खासगी संस्थांची मदत घेऊन ७५ शाळा विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात अधिकाधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य दिले जाणार आहे. २८ जूनपासून शहरातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. मात्र शहरातील शाळा सुरू करण्याबाबत शाळांची तयारी, पहिल्या दिवसापासून प्रत्येक शाळेचे नियोजन करून शैक्षणिक कार्य सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिवे यांनी प्रशासनाला दिले. शहरातील सहा मतदार संघात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणे, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाॅटर बॉटल वितरण यावर चर्चा करण्यात आली.