आता व्हीसीए आणि नागपूर पोलिसांदरम्यान टी-२०
By admin | Published: January 31, 2017 02:37 AM2017-01-31T02:37:59+5:302017-01-31T02:37:59+5:30
भारत आणि इंग्लंड दरम्यानचा टी-२० सामना रविवारी पोलिसांच्या विना परवानगीविनाच पार पडला. मात्र,
सुरक्षेच्या मुद्यांवरून मतभेद : विना परवानगीने झाला सामना
नागपूर : भारत आणि इंग्लंड दरम्यानचा टी-२० सामना रविवारी पोलिसांच्या विना परवानगीविनाच पार पडला. मात्र, या सामन्याच्या निमित्ताने विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि शहर पोलिसांमध्ये सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवरून मतभेद झाल्याने व्हीसीए आणि पोलिसांदरम्यान टी-२० रंगला आहे. या सामन्यातून धक्कादायक परिणाम पुढे येण्याचेही संकेत मिळाले आहेत.
सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याची व्हीसीएसच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी चालविली होती. मात्र, त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्याचे सांगितले. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता, अग्निशमन दल, आपात्कालीन मार्गाचे निर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र, सुरक्षा रक्षक म्हणून वावरणाऱ्यांची यादी, त्यांची शहानिशा करण्यासाठी पोलिसांना त्यांचे नंबर, पार्किंग व्यवस्था आदी सुरक्षेबाबतच्या या सूचना होत्या.
यासंबंधीचे पत्र देतानाच त्यांना सशर्त परवानगी दिली होती. व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी अखेरपर्यंत या बाबींची पूर्तता न केल्यामुळे पोलिसांनी दिलेली सामन्याची सशर्त परवानगी रद्द केली. ही परवानगी नाकारतानाच विना परवानगी क्रिकेट सामना घेतला गेला अन् कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्यास कारवाई करू, असा इशाराही दिला. मात्र, त्याला दाद न देता व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट सामना आयोजित केला.
इकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि हजारोंच्या संख्येत येणारे क्रिकेटप्रेमी या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आपली सर्व शक्ती लावून बंदोबस्त केला. हजारोच्या संख्येत या मार्गावर वाहने धावत असतानादेखील जागोजागी आणि प्रसंगी मध्ये शिरून पोलिसांनी वाहतुकीला अडसर किंवा कुणाच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घेतली. सामना होण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तो सामना संपल्यानंतरही पोलिसांचा बंदोबस्त सुरूच होता. सोमवारी पहाटे २ वाजता पोलिसांचा क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त संपला. पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र, या सामन्याच्या निमित्ताने आता अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत.(प्रतिनिधी)
लोकमतने केले उघड
दरम्यान, हा सामना परवानगी नसतानाच खेळवला गेल्याची बाब गोपनीय ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. मात्र, लोकमतने व्हीसीएने आंतरराष्टीय क्रिकेट सामन्याचे आयोजन विना परवाना केल्याचे वृत्त सोमवारी ठळकपणे प्रकाशित केले. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या बाबीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आल्यामुळे शहर पोलिसांना अनेकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आता पोलिसही अडचणीत सापडले आहेत. त्याचमुळे सोमवारी दिवसभर पोलीस विभागात वरिष्ठांची धावपळ, बैठका आणि वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू होती. त्यातून व्हीसीए आणि पोलिसांदरम्यान टी-२० चा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.