आता तृतीयपंथी व्यक्तीला स्वत:ला 'स्त्री' म्हणण्याचा मिळाला मार्ग; केंब्रिज शब्दकोशाने विस्तारले स्त्री व पुरुष शब्दांचे अर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 09:46 PM2022-12-14T21:46:14+5:302022-12-14T21:47:09+5:30
आतापर्यत स्त्री व पुरुष आणि तृतीयपंथी एवढीच लिंगआधारित केलेली वर्गवारी मान्यता पावली असताना, केंब्रिज डिक्शनरीने एक मोठे पाऊल उचलून त्यात विस्तार केला आहे.
नागपूर: आतापर्यत स्त्री व पुरुष आणि तृतीयपंथी एवढीच लिंगआधारित केलेली वर्गवारी मान्यता पावली असताना, केंब्रिज डिक्शनरीने एक मोठे पाऊल उचलून त्यात विस्तार केला आहे.
डिक्शनरीच्या या नव्या विस्तारानुसार, जन्माच्या वेळी बालकाचे लिंग कोणतेही असो, त्याची ओळख ही त्याच्या रहाणीमान व विचारसरणी आणि जगण्याच्या पद्धतीवरून, स्त्री वा पुरुष अशी केली जाणार आहे.
टेलिग्राफच्या अहवालानुसार, स्त्री व पुरुष या दोन शब्दांच्या व्याख्येचा विस्तार करण्यात आला आहे. त्यानुसार, जन्माच्या वेळी कोणतेही लिंग व्यक्तीला प्राप्त झालेले असले तरी, ती व्यक्ती स्वत:ला स्त्री वा पुरुष यापैकी जे मानत असेल, तीच त्याची ओळख राहणार आहे.
याचाच अर्थ असा की, एखादे मूल पुरुष म्हणून जन्माला आले असेल आणि त्याला पुढे वाढत्या वयात आपण स्त्री असल्याचे जाणवल्यानंतर तो आपले जेंडर हे स्त्री म्हणून दर्शवू शकतो.
या निर्णयाचे स्वागत जगभरातील एलजीबीटीक्यू नागरिकांनी केले आहे.
ब्यूमोंट सोसायटी चॅरीटीचे अध्यक्ष डॉ. जेन हेमलिन यांनी या बदलाचे स्वागत करून, नव्या व्याख्येमुळे तृतीयपंथियांना मोठा दिलासा मिळला असल्याचे म्हटले आहे.