आता लग्नासाठी थेट २६ जूनचा मुहूर्त; व्यावसायिकांना आर्थिक झळ
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 6, 2024 08:58 PM2024-05-06T20:58:56+5:302024-05-06T20:59:02+5:30
- तब्बल २३ वर्षानंतर ही परिस्थिती : विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी
नागपूर: यावर्षी मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. ३ मे ते २५ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लग्नकार्य नसल्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मे आणि जून महिन्यात लग्नकार्य नसल्यामुळे बँडवाल्यांपासून ते मंडप डेकारेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, कॅटरर्स, पुरोहित, छायाचित्रकारांपर्यंत आदी लग्न कार्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. मे आणि जून महिन्यात लग्न तारखा नसल्यामुळे या दिवसात काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत.
दरवर्षी मे आणि जून महिन्यात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडतात. यंदा मात्र मे-जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मेमध्ये केवळ १ आणि २ रोजी आणि २५ जूननंतर मुहूर्त आहेत. अशी परिस्थिती २३ वर्षांनंतर पहिल्यांदा आली आहे.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त
यंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. काही कुटुंब मुहूर्त न बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनस्थितीत आहेत. मेमध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिलमध्येच आटोपून घेतले. नुकतेच लग्न जुळलेल्या युवक-युवतींना मुहूतार्साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जोखिम घेऊ नये
लग्नाच्या वेळेत गुरू महत्त्वाचा असतो. गुरूच्या बाबतीत जोखिम घेता येत नाही. गुरू आणि शुक्र या दोघांपैकी एकाचा अस्त असताना मुहूर्त असतात. पण, दोघांचा एकत्रित अस्त असल्याने मे महिन्यात अवघे दोन दिवस मुहूर्ताचे होते. २५ जूननंतर लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न एक वा दोन महिने उशिरा झाले तर काहीही फरक पडणार नाही. डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य.