परीक्षा विभागावर आता कुलगुरूंचा ‘कंट्रोल’

By admin | Published: March 20, 2017 02:00 AM2017-03-20T02:00:27+5:302017-03-20T02:00:27+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे.

Now the Vice Chancellors 'control' | परीक्षा विभागावर आता कुलगुरूंचा ‘कंट्रोल’

परीक्षा विभागावर आता कुलगुरूंचा ‘कंट्रोल’

Next

परीक्षा संचालकांकडून प्र-कुलगुरूंकडे फायली जाणार नाहीत : परीक्षा विभागाचे काय होणार?
योगेश पांडे   नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे. मात्र डॉ. येवले यांचा परीक्षा विभागावरील ‘कंट्रोल’ कुलगुरूंच्या हाती येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन संचालकांना विविध फायली प्र-कुलगुरूंना न पाठवता थेट कुलगुरुंना पाठवाव्या लागणार आहेत. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिवांनी यासंदर्भात परिपत्रकच जारी केले आहे. डॉ. येवले परीक्षेच्या कामापासून दूर झाले तर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे काय होणार, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरुंवर संपूर्ण विद्यापीठाचीच जबाबदारी असते व त्यांची कार्यकक्षा व्यापक असते. कामाचा भार लक्षात घेता. जुन्या विद्यापीठ कायदा अस्तित्वात असेपर्यंत नागपूर विद्यापीठात परीक्षेचा भार हा प्र-कुलगुरूंवरच होता. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्र-कुलगुरूंच्या कार्यकक्षेतदेखील बदल झाला आहे. जारी झालेल्या परिपत्रकानुसार प्र-कुलगुरूंकडे ‘बीसीयूडी’ची मोठी जबाबदारी राहणार आहे. नवीन कायद्यात ‘बीसीयूडी’ संचालकांचे पदच नाही. या पदाची बहुतांश कर्तव्ये व अधिकार प्र-कुलगुरूंना प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत परीक्षा विभागातून प्र-कुलगुरूंकडे फायली यायच्या. यामुळे अनेक गैरप्रकारदेखील कमी झाले होते. मात्र यापुढे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना परीक्षा व मूल्यमापन विभागातील सर्व फायली थेट कुलगुरूंच्या अंतिम मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. यामुळे प्र-कुलगुरुंऐवजी थेट कुलगुरुंचाच परीक्षा विभागावर ‘कंट्रोल’ राहणार आहे.

नियमानुसार जबाबदारीचे वाटप
यासंदर्भात कुलसचिव पूरण मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यातील नियमांनुसार अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्र-कुलगुरूंकडे परीक्षा विभागाचे काम होते. मात्र आता त्यांच्याकडे ‘बीसीयूडी’चे ९५ टक्के काम आले आहे. शिवाय ‘बीसीयूडी’, महाविद्यालयीन शाखा व विकास शाखा यांचा मिळून ‘महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग’ तयार झाला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी प्र-कुलगुरूंकडे राहणार आहे. परीक्षा विभागातील ज्या समित्यांवर प्र-कुलगुरुंचा सहभाग आहे, त्याचे काम ते निश्चित बघतील. शिवाय कुलगुरूदेखील आवश्यकतेनुसार प्र-कुलगुरूंचा सल्ला घेऊ शकतील, असे मेश्राम यांनी सांगितले.
परीक्षा विभागाला फटका बसणार ?
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्यात प्र-कुलगुरूंचा मौलिक वाटा असल्याचे कुलगुरूंनीदेखील अनेकदा म्हटले आहे. त्यांच्याच पुढाकारामुळे परीक्षा विभागाचे अत्याधुनिकीकरण होत असून निकालांचा वेगदेखील वाढला. शिवाय ‘पीएचडी’च्या बजबजपुरीलादेखील त्यांनी कात्री लावत दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परीक्षा विभागातील दैनंदिन कारभारावर त्यांचे लक्ष होते. बहुतांश फायली त्यांच्याच नजरेखालून पुढे आवश्यकतेनुसार कुलगुरूंकडे जात होत्या. अशा स्थितीत ते परीक्षेच्या कामापासून दूर झाल्यास परीक्षा विभागाचा वेग मंदावेल की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान नव्या विद्यापीठ कायद्यातील कलम १३ अनुसार प्र-कुलगुरूंकडेची कार्यकक्षा संपूर्ण विद्यापीठ असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर काही कलमांनुसारदेखील परीक्षा विभागाशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title: Now the Vice Chancellors 'control'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.