विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष गोपाल देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:21 PM2017-12-22T23:21:13+5:302017-12-22T23:23:12+5:30
विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.
वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ ला विदर्भ साहित्य संघाचे संमेलन होणार आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार अध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यात आली होती. त्यात कवी सुधाकर गायधनी यांची अध्यक्षपदासाठी निवड केली होती. गायधनी यांनी संघाला ही निवड आपल्याला मान्य नसल्याचे लेखी कळविले होते. त्यामुळे संघाने डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. देशपांडे हे मूळचे वर्धेचे असून, त्यांनी विज्ञान कवी म्हणून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांचा ‘लिटमस’ हा कवितासंग्रह, आठ कादंबऱ्या , नाटक, सैद्धांतिक लेखन, गीतकविता आणि राजा शहाजी ही महाकादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘अरण्यकांड’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विदर्भातील वाङ्मयीन चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. पथनाट्याचे आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षतेखाली वणी येथे होणारे संमेलन यश्स्वी होईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.