आता घराची भिंतही रेडीमेड : वॉल पॅनल आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:13 PM2018-11-24T23:13:04+5:302018-11-24T23:15:15+5:30
तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.
भारतीय रस्ते परिषदेच्या तांत्रिक प्रदर्शनात असलेल्या इको स्मार्ट वॉल पॅनलच्या स्टॉलवर या रेडीमेड भिंती पाहता येतात. याचे संचालक वरुण सचदेवा यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, फ्लाय अॅश आणि सिमेंटने हे पॅनल वॉल तयार केले जातात. ते आपसात जोडून भिंत उभारली जाते. या भिंती हलक्या आणि मजबूत आहे. यामुळे रेती, सिमेंट आणि विटांचा खर्च वाचतो. प्लास्टर करायची गरज नाही. पुटिंग करून किंवा थेट रंगही मारता येतो. एकूण घराच्या बांधकामात तब्बल २० टक्के खर्च अशा भिंतींमुळे वाचतो. शिवाय या भिंती चार इंचीच्या असल्याने जागाही भरपूर उपलब्ध होते. त्यामुळे या भिंती आता काळाची गरज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग
भारतीय रस्ते परिषदेसाठी नागपुरात देशभरातील रस्ते बांधणारे अभियंते सहभागी झाले आहेत. ते रस्ते बांधणीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आले आहेत. या तंत्रज्ञानातून रस्ते अधिक दर्जेदार आणि सुविधाजनक कसे करता येतील, यावर ते चर्चा करीत आहेत. या सर्वांदरम्यान मानकापूर स्टेडिमला लागून असलेला ‘सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा देखावा हा मार्गदर्शन ठरणारा आहे.
दिलीप चिंचमलातपुरे यांनी हा देखावा तयार केला आहे. सुरुवातीला फुलझाडांनी युक्त असे हे सौंदर्यीकरण असल्याचा भास होतो. परंतु त्याच्या मागे त्यांचा एक विचार आहे. येथे डोंगराळ भागात रस्ते बांधताना पूर्ण डोंगर कापण्याची गरज नाही. केवळ रस्त्यापुरते डोंगर कापा. परिसरात झाडे लावा, तलाव तयार करा. तलावाची माती रस्त्यांसाठी वापरा. डोंगरातून पाणी झिरपून तलावात साचेल. त्यामुळे वर्षभर पाणी राहील. ते लोकांना उपलब्ध होईल. तलावात मासेमारी केल्याने रोजगारही मिळेल, असा एकूण संदेश देणारा हा देखावा मार्गदर्शक ठरला आहे.