आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात दिसणार पांढरे, काळे अन् लाल हरीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 07:30 AM2021-10-08T07:30:00+5:302021-10-08T07:30:02+5:30
Nagpur News आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी अधिक आकर्षक होणार आहे. कारण येथे अल्बिनो ब्लॅक बक (पांढरे), ब्लॅक बक (काळे) आणि बार्किंग डियर (लाल) हरिणांसोबतच चार सांबरही आले आहेत.
नागपूर : आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी अधिक आकर्षक होणार आहे. कारण येथे अल्बिनो ब्लॅक बक (पांढरे), ब्लॅक बक (काळे) आणि बार्किंग डियर (लाल) हरिणांसोबतच चार सांबरही आले आहेत. गोरेवाडातील पथकाने दिल्लीच्या नॅशनल झुलॉजिकल पार्कमधून गुरूवारी हे प्राणी आणले आहेत.
गुरुवारी २.३० वाजता हे प्राणी पथकासोबत आणण्यात आले असून यात २० लाल हरीण, १० काळे हरीण, १० पांढरे हरीण आणि ४ सांबर आहेत. सध्या या वन्यप्राण्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा कालावधी संपताच त्यांना तृणभक्षी प्राण्यांसाठी असलेल्या ४० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या एन्क्लोजरमध्ये ठेवले जाईल.
पुढील टप्प्यात मणिपूरच्या जंगलात आढळणारे ८ संगाई हरीण (डासिंग डियर) आणि ४ सांबर नागपुरात आणले जात आहेत. नॅशनल झुलॉजिकल पार्कच्या या प्राण्यांच्या हस्तांतरण प्रस्तावाला प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १६ सप्टेबरला मंजुरी दिली होती. त्यानंतर २ मादी वाघांसह २ नर-मादी अस्वल गोरेवाडातून दिल्लीला पाठविण्यात आले होते.