नागपुरात दहनघाटावर आता लाकूड मोफत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:32 AM2018-06-04T11:32:35+5:302018-06-04T11:32:42+5:30
राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका अंबाझरीसह शहरातील अन्य चार घाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाऐवजी ‘मोक्षकाष्ट’ मोफत उपलब्ध करणार आहे. जर कुणाला लाकू ड हवे असेल तर ते विकत घ्यावे लागेल. यासाठी लाकडाची पूर्ण किंमत मोजावी लागेल. मोक्षधाम घाट, मानकापूर, मानेवाडा व सहकार नगर घाटावर लवकरच ही व्यवस्था लागू के ली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीकडे मंजुरीसाठी येणार आहे. मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाईल.
एका अंत्यसंस्कारासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. महापालिकेतर्फे अंत्यसंस्कारासाठी लाकूड मोफत उपलब्ध केले जाते. परंतु लाकडाचा वापर होत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे मोक्षकाष्टाचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबाझरी घाटावर सुरूवात करण्यात आली होती. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. याचा विचार करता अन्य घाटावर टप्प्याटप्प्याने मोक्षकाष्टाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोक्षकाष्ट शेतातील भुसा, पºहाटी याचा वापर करून बनविले जातात.
एका अंत्यसंस्कारासाठी २५० किलो मोक्षकाष्ट लागते तर लाकूड ३०० किलो लागते. मोक्षकाष्टाचा वापर केला तर एका अंत्यसंस्कारासाठी १७५० रुपये खर्च येतो. लाकडाचा वापर केल्यास २२११ रुपये खर्च येतो. त्यामुळे मोक्षकाष्टाचा वापर केल्यास महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे. दर महिन्याला घाटावर दीड हजाराहून अधिक अंत्यसंस्कार केले जातात. वर्षाला तीन कोटींचा खर्च केला जातो.
प्रस्ताव तयार केला आहे
पर्यावरणाचा विचार करता मोक्षकाष्ट वापरला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याबाबतचा प्रस्ताव आधीच तयार करण्यात आला होता. अंबाझरी घाटावर याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे अन्य चार घाटावर ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
अनेकांचा मोक्षकाष्टाला नकार
अंबाझरी घाटावर सुरुवातीला मोक्षकाष्टाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नागरिकांकडून नकार मिळत होता. हळूहळू लाकूड आणि मोक्षकाष्ट उपलब्ध करण्यात आले. आता मोक्षकाष्टाला विरोध होत नाही. परंतु जुनी वस्ती असलेल्या दहनघाटांपैकी गंगाबाई घाट, वैशालीनगर घाट आदी ठिकाणी नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविली.