Maharashtra Election 2019; प्रचारासाठी आता कार्यकर्त्यांचीही ‘दुकानदारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 10:22 AM2019-10-07T10:22:28+5:302019-10-07T10:23:02+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासाचे दर ठरवून कार्यकर्ते पुरविणाऱ्या अशा दुकानदारांचा ‘धंदा’ सध्या बराच चर्चेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारांच्या रॅलीत गर्दी किती, यावरून अंदाज बांधण्याची आपल्याकडे मानसिकता आहे. ज्या उमेदवाराच्या सभेत अथवा रॅलीत अधिक गर्दी असेल तो उमेदवार तगडा असा अंदाज बांधणारी मतदारांची मानसकिता लक्षात घेऊन आता हवी तेवढी गर्दी वाढविणारे ‘कार्यकर्ता सप्लायर्स’ सक्रिय झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासाचे दर ठरवून कार्यकर्ते पुरविणाऱ्या अशा दुकानदारांचा ‘धंदा’ सध्या बराच चर्चेत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे कार्यकर्ता सप्लायर्स बरेच सक्रिय झाले आहेत. किंमत मोजू शकणारा तगडा उमेदवार कोण असणार याचा शोध घेत ही मंडळी आता थेट उमेदवारासोबतच संपर्क साधत आहेत. कार्यकर्ते किती हवे यापासून तर कार्यकर्ते कोणत्या कॅटॅगिरीतील हवे यानुसार हे दर आहेत. प्रचार सभा, रॅली, कॉर्नर सभा, द्वारभेटी एवढेच नाही तर मतदारांमध्ये उमेदवाराची इमेज वाढविण्यासाठी मार्केटिंग करणारे भाड्याचे कार्यकर्तेही पुरविण्याची तयारी या सप्लायर्स मंडळींनी ठेवली आहे.
काही अपवाद वगळता झोपडपट्टी, गरीब वस्त्यांमधील स्त्री-पुरुष हे या सप्लायर्सचे भांडवल आहे. यासोबतच कॉलेजमध्ये शिकणाºया युवा वर्गालाही तासाच्या बोलीवर आणि नगदी पैसे देऊन रोजगार देण्याचा उपक्रम या सप्लायर्सनी सुरू केला आहे. निवडणुकीच्या दिवसांमध्ये उमेदवारांनाही आपल्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी हवीच असते. नेत्यांच्या पक्षबदलामुळे आता त्यांच्यातच निष्ठा राहिलेली नाही. निष्ठावान कार्यकर्ते घराबाहेर पडण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे असे किरायाचे कार्यकर्ते घेऊन आपली गर्दी वाढविण्याशिवाय आता उमेदवारांनाही पर्याय राहिलेला नाही.
क्वॉलिटीनुसार भाड्याचे कार्यकर्ते
उमेदवाराची सभा अथवा प्रचार ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील लोकॅलिटीनुसार कार्यकर्ते असणार आहेत. भाड्याने आणले जाणारे बहुतेक कार्यकर्ते गरीब असल्याने त्यांच्या वेशावरून ते ओळखू येतात. यावरही या सप्लायर्सनी उपाय शोधला आहे. पॉश वस्त्या आणि कॉलनींमध्ये प्रचारासाठी सुटाबुटातील कार्यकर्ते तर सर्वसाधारण भागातील प्रचारासाठी साधारण वेशातील कार्यकर्ते मिळणार आहेत. मात्र त्यासाठी दरही तसेच राहणार आहेत.
असे आहेत भाड्याच्या कार्यकर्त्यांचे दर
या कार्यकर्त्यांचे दर तासाच्या हिशेबाने आहेत. दोन तासांसाठी २०० रुपये, तीन तासांसाठी ३०० रुपये, चार तासापेक्षा अधिक तासासाठी ५०० रुपये असा दर आहे. या कार्यकर्त्यांना वेळेवर पोहचविण्याची हमीही हे सप्लायर्स घेत असल्याने, आपल्या सभेत गर्दी जमविण्याचा उमेदवारांचा प्रश्न मिटणार आहे.
आधी करावे लागते प्रबोधन
रोज वेगवेगळ्या ठिकाणे भाड्याने जाणाºया या कार्यकर्त्यांना आपण आज कुणाच्या प्रचारावर आहोत हे लक्षात राहावे यासाठी हे सप्लायर्स प्रबोधनही करतात. त्यानुसार वापरायचे झेंडे, दुपट्टे, बिल्ले याबद्दलही ते माहिती देतात. एवढेच नाही तर प्रचार करताना ऐन वेळी घोळ होऊ नये म्हणून उमेदवार कोण आणि तो कोणत्या पक्षाचा याचीही माहिती सप्लायरला या किरायाच्या कार्यकर्त्यांना द्यावी लागते.