आता ‘योग व निसर्गाेपचार पदवी’ अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:02 PM2019-02-04T12:02:30+5:302019-02-04T12:04:33+5:30
‘योग व निसर्गोपचार पदवी’ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅन्ड योगा सायन्सेस) या नवीन अभ्यासक्रमासह चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होत असून, राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय ३१ जानेवारी २०१९ रोजी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘योग व निसर्गोपचार पदवी’ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅन्ड योगा सायन्सेस) या नवीन अभ्यासक्रमासह चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत हे अभ्यासक्रम सुरू होत असून, राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय ३१ जानेवारी २०१९ रोजी घेतला आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने योग व निसर्गोपचार प्रमाणपत्र, योग व निसर्गोपचार पदविका, योग व निसर्गोपचार पदवी आणि योग व निसर्गोपचार पदव्युत्तर पदविका हे चार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. वरील अभ्यासक्रमांपैकी योग व निसर्गोपचार पदवी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅन्ड योगा सायन्सेस) या अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा पाठ्यक्रम तसेच शैक्षणिक सोईसुविधा, अध्यापक वर्ग आदी किमान मानके विद्यापीठामार्फत तयार करण्यात आलेली आहेत. वरील अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने एका पत्राद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने योग व निसर्गोपचार पदवी (बीएनवायएस) या अभ्यासक्रमास राज्य शासनाने ३१ जानेवारी २०१९ रोजी निर्णय घेऊन मान्यता दिली. सोबतच योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम व निकष महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत निश्चित करण्यात यावेत, वरील अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम व निकष निश्चिती झाल्यानंतर विद्यापीठामार्फत ते शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचनाही शासनाने विद्यापीठाला केल्या आहेत. यामुळे लवकरच मेडिकल महाविद्यालयातून हे अभ्यासक्रम चालविले जाण्याची शक्यता आहे.
‘डॉक्टर’ पदवी लावता येणार नाही
‘योग व निसर्गोपचार व्यावसायिक’ अधिकृतपणे ‘नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून व्यवसाय करण्यास वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार पात्र ठरणार नाहीत. योग व निसर्गोपचार व्यावसायिक हे वैद्यक व्यवसायी म्हणून मानण्यात येणार नाहीत किंवा त्यांना वैद्यकीय व्यवसायी असल्याचा दावा करता येणार नसल्याचे निर्णयात म्हटले आहे. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना आपल्या नावापुढे वा नंतर डॉक्टर किंवा तत्सम पदवी लावता येणार नाही, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे.