न.प. अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:14+5:302021-02-05T04:37:14+5:30

पारशिवणी : नगर पंचायतच्या अभियंत्यास अश्लील शिवीगाळ करून जीवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना पारशिवनी नगर पंचायतच्या कार्यालयात ...

N.P. Engineer threatened to kill | न.प. अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

न.प. अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

Next

पारशिवणी : नगर पंचायतच्या अभियंत्यास अश्लील शिवीगाळ करून जीवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना पारशिवनी नगर पंचायतच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी घडली. या घटनेचा निषेध पारशिवनी नगर पंचायत कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केला. परंतु सदर प्रकरणात कलम ३५३ का दाखल करण्यात आले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. नगर पंचायत पारशिवनी येथे धनंजय ढोले हे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता (अतिरिक्त) पदावर कार्यरत आहेत. नगर पंचायतच्या वतीने शववाहिनीच्या फेब्रिकेशन कामाचे कंत्राट वैष्णवी बॉडी वर्क, नागपूर या दुकानदारास २ लाख ९१ हजार ९९७ रुपये लिफाफा पद्धतीने देण्यात आले होते. सदर कामाची देयके कुठलीही सुरक्षा ठेव कपात न करता देण्यात यावीत, असा तकादा संबंधित कंत्राटदाराने अभियंत्यास लावला होता. तसेच बिल २७ जानेवारीला नगर पंचायत कार्यालयात सादर केले होते, सोबतच ९९ हजार ९९९ रुपयाची देयकेदेखील सादर करण्यात आली. विशेष बाब म्हणजे ९९ हजाराच्या देयकाबाबत कोणताही वर्क ऑर्डर नगर पंचायतमार्फत कंत्राटदारास देण्यात आला नव्हता. मंगळवारी सकाळी ११ वाजता कंत्राटदाराने धनंजय ढोले यास भ्रमणध्वनीद्वारे पूर्ण बिल दिले नाही तर तुला जीवानिशी ठार मारेल व नगर पंचायतमध्ये येऊन शववाहिनी पेटवून देईल, अशी धमकी दिली तसेच अश्लील शिवीगाळदेखील केली. या भ्रमणध्वनीची रेकॉर्डिंग ढोलेकडे उपलब्ध आहे. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार अभियंता धनंजय ढोले यांनी पारशिवनी पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी कलम ५०७ अन्वये अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली. यानंतर दुपारी चेतन शाहू हा अन्य एका साथीदारासह नगर पंचायत कार्यालयात आला. तिथे येताच त्याने पुन्हा शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी तिथे नगर पंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या म्हणण्यानुसार २ लाख ९१ हजार ९९७ रुपयाचा चेक कंत्राटदारास देण्यात आला व उर्वरित रक्कम नंतर देण्यात येईल, असे कंत्राटदारास सांगितले. यानंतर धनंजय ढोले नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यासह सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. तिथे पोलिसांनी पुन्हा कलम ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला. आपण नियमानुसार बिल काढण्याची प्रक्रिया करीत होतो. कोणत्याही प्रकारचे कमिशन कंत्राटदारास मागण्यात आले नाही तरीदेखील सदर प्रकार घडला, असे धनंजय ढोले यांनी सांगितले.

कलम ३५३ का नोंदविले नाही?

शासकीय कर्मचाऱ्यास कर्तव्यावर असताना शासकीय कार्यात कुणी अडथळा आणला, शिवीगाळ केली किंवा जीवानिशी मारण्याची धमकी दिली असे जर प्रकरण घडले तर सहसा कलम ३५३ सह इतर कलम लावण्यात येते. यापूर्वी पारशिवनी नगर पंचायतने एका प्रकरणात तक्रार केली असता सदर कलम तात्काळ लावण्यात आले होते. मात्र यावेळी नगर पंचायतचे सर्व कर्मचारी ३५३ कलम लावण्याबाबत विनंती करीत असतानादेखील सदर कलम का लावण्यात आले नाही, असा प्रश्न नगर पंचायत कर्मचारी करीत आहेत.

----

मी आपले बिल मागण्याकरिता गेलो असता सदर प्रकार घडला. मला बिल काढण्याकरिता अभियंत्याने पैशाची मागणी केली. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.

- चेतन शाहू, कंत्राटदार, वैष्णवी बॉडी वर्क

Web Title: N.P. Engineer threatened to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.