महाराष्ट्रात 'एनआरसी' व 'सीएए' लागू करू नये : नागपुरात मुस्लिमांचा भव्य मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 07:30 PM2019-12-19T19:30:46+5:302019-12-19T19:42:36+5:30
: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.
मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात रंगा-बिल्लाचे सरकार सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी निरर्थक कायदे तयार केले जात आहेत. त्यामुळे देशात हिंसाचार माजला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा देश संकटात असून, सरकारकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलेही धोरण नाही. महाराष्ट्रात असे कायदे लागू होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘एनआरसी’ व ‘सीएए’ असे कायदे लागू करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते. परंतु भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. आमचे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
नेतृत्व : जावेद पाशा, डॉ. अनवर सिद्धीकी, शिराज अहमद कासमी, शाहीद रंगुनवाला, हाजी परवेज बेग, रुबीना पटेल, शाहिस्ता खान, शकील महोम्मदी, प्रा. शरद वानखेडे, वसीम शेख, तौसिफ जाफर खान, अफजल फारुक, शकील महोम्मद, शकील पटेल, हनीफ कुरेशी, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज.