‘एनआरएचएम’चा ‘तो’ निधी मेळाव्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 08:27 PM2020-09-21T20:27:08+5:302020-09-21T20:29:45+5:30
गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. जिल्ह्यात कुठल्याच एनआरएचएमने शासकीय सेवेत कायम करून देण्याच्या आमिषापोटी १ लाख रुपये दिलेले नाहीत. आरोग्य सेविकांची लूट आम्ही होऊ देणार नाही, असा दावा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या मुख्य संयोजक कुंदा सहारे यांनी केला.
‘संघटनांकडूनच सुरू आहे कर्मचाऱ्यांची लूट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्य संयोजक कुंदा सहारे, पौर्णिमा लांजेवार, माया रंगारी, मनिषा मेंढे, छाया चौधरी, नितू इंगळे, भारती बागडे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय आरोग्य अभियानात तुटपुंज्या मानधनावर आरोग्य सेविका कार्यरत आहेत. संघटनेतर्फे न्यायासाठी विविध आंदोलन केले, पण शासन स्तरावर कोणत्याही मागणीला यश प्राप्त झाले नाही. या लढ्याला बळ देण्यासाठी गडचिरोली येथे राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्यासाठी आरोग्य सेविकांकडून निधी गोळा करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हाच निधी मिळाला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, न्यायासाठी आमचा लढा सुरू आहे. या लढ्यासाठी बैठका, मेळावे, प्रवास खर्च, न्यायालयात याचिका दाखल करणे, कर्मचारी गंभीर आजारी असल्यास मदत निधी, कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या अभियानातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह निधी आदीसाठी संघटनांकडून लढा निधी उभारण्यात येत आहे. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर समितीचे बँक खाते नसल्याने तालुका स्तरावरून निधी जमा करणे सुरू आहे.