शिक्षणमंत्र्यांविरोधात ‘एनएसयूआय’ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:20 AM2017-10-26T01:20:21+5:302017-10-26T01:20:34+5:30
विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाच्या उदासीन धोरणावरून विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाच्या उदासीन धोरणावरून विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. बुधवारी ‘एनएसयूआय’ने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सोबतच प्राधिकरण निवडणुकांसोबतच पदवीधर गटातील निवडणुका घेण्याचीदेखील त्यांनी मागणी केली.
राज्य शासनाकडून विद्यार्थी संघ निवडणुकांबाबत कुठलेही दिशानिर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया थंडबस्त्यात टाकली आहे. दुसरीकडे प्राधिकरण निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. मात्र अद्यापदेखील प्रशासनाकडून वेळापत्रकाची अधिकृत घोषणा झालेली नाही. यावरून ‘एनएसयूआय’ने हे आंदोलन केले.
प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंह यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली. विधीसभा, विद्वत् परिषद व अभ्यास मंडळ या विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. मात्र पदवीधर गटाच्या निवडणुका जानेवारी महिन्यातच होऊ शकणार आहेत. या सर्व निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात तसेच विद्यार्थी संघाच्यादेखील निवडणुका घ्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाकडून अद्याप काहीच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे निवडणुका घेणे शक्य नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळू नये हीच विद्यार्थी संघ आणि पदवीधर गटाच्या निवडणुका न घेण्यामागे भूमिका असल्याचा आरोप यावेळी ‘एनएसयूआय’तर्फे करण्यात आला. कुलगुरूंकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा पुतळा जाळला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.