पाच वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसीन थंडबस्त्यात; हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना कसा मिळणार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 04:16 PM2023-10-30T16:16:19+5:302023-10-30T16:16:36+5:30

जिल्हा वार्षिक योजनेतून ८ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद

Nuclear medicine in the cold for five years; How heart, kidney, cancer patients will benefit! | पाच वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसीन थंडबस्त्यात; हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना कसा मिळणार लाभ!

पाच वर्षांपासून न्यूक्लिअर मेडिसीन थंडबस्त्यात; हृदय, किडनी, कर्करोगाच्या रुग्णांना कसा मिळणार लाभ!

सुमेध वाघमारे

नागपूर : एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्यूक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली. जिल्हा वार्षिक योजनेतून ८ कोटी ३० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. परंतु नंतर याला कोणीच गंभीरतेने घेतले नाही. परिणामी, कर्करोगाचा निदानासोबतच एन्डोक्रिनोलॉजी, थायराईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्यूरोलॉजी व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांना कसा मिळणार लाभ, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावरील उपचाराचा यशाचा दर वाढतो. शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. परंतु शासकीय रुग्णालयात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना याचे निदान करण्यासाठी खासगीचा रस्ता धरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मेडिकल प्रशासनाने ‘न्युक्लिअर थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही उपचार पद्धती एक्स-रे व सीटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आहे. त्यात ‘गॅमा कॅमेरा’च्या माध्यमातून कर्करोग आहे किंवा नाही, कर्करोग झाला असल्यास देत असलेल्या उपचाराला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्या किती पेशीबाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण या ‘न्यूक्लिअर मेडिसीन’ मध्ये होते. एखाद्या अवयवाला बाधा झाली असेल त्याचा किती भाग निकामी झाला आहे किंवा चांगला आहे तसेच उपचारामुळे किती प्रमाणात सुधारणा होते आहे या सर्व बाबी या उपचारपद्धतीमधून सामोर येतात. असेच हृदय रोग, एन्डोक्रिनोलॉजी, थायरॉईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्यूरोलॉजीसंदर्भात आहे.

- हृद्यविकाराचा झटक्यानंतर किती स्नायू मृत झाले याचेही होते निदान

हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाच्या स्नायूंची स्थिती कशी आहे, किती स्नायू मृत झाले आहेत याचे निदान ‘न्युक्लिअर मेडिसीन’मधून होते. स्नायू मृत झाले असतील तर ‘स्टेंट’चा काही उपयोग होत नाही. एकूणच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार होते शिवाय, या अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार होत्या. परंतु या सर्वांनाच आता ग्रहण लागले आहे.

- अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुरू व्हावे नवा विभाग

‘न्यूक्लिअर मेडिसीन’ या नव्या विभागासाठी २०१७-१८ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली. नंतर हा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला, नंतर या प्रस्तावाचा पाठपुरावाच करण्यात आला नाही. परंतु आता डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या नव्या विभागाला मंजुरी मिळाल्यास मेडिकलच्या रुग्णांसाठी तो वरदान ठरेल.

Web Title: Nuclear medicine in the cold for five years; How heart, kidney, cancer patients will benefit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.