नागपुरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:06 PM2018-02-19T22:06:50+5:302018-02-19T22:08:55+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरारक दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी गणेश रामबरण शाहू (वय २६) या मुख्य आरोपीसह त्याची पत्नी गुडिया गणेश शाहू (वय २३), भाऊ अंकित रामबरण शाहू आणि मावशीचा मुलगा सिद्धू शाहू यांनाही सोमवारी अटक केली. त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली आहे. दरम्यान, गणेश शाहूला आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा २३ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. अन्य आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरारक दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी गणेश रामबरण शाहू (वय २६) या मुख्य आरोपीसह त्याची पत्नी गुडिया गणेश शाहू (वय २३), भाऊ अंकित रामबरण शाहू आणि मावशीचा मुलगा सिद्धू शाहू यांनाही सोमवारी अटक केली. त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली आहे. दरम्यान, गणेश शाहूला आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा २३ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. अन्य आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.
पवनपुत्रनगर, अम्माच्या दर्गाहमागे राहणारे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषाताई सेवकदास कांबळे (वय ५४) आणि मुलगी राशी रविकांत कांबळे (वय दीड वर्षे) या दोघांची शनिवारी सायंकाळी निर्घृण हत्या झाली. त्यानंतर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या पोत्यात भरून शहराबाहेरच्या नाल्यात फेकून दिले. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हे दुहेरी हत्याकांड उघड झाल्यानंतर उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. गुन्हे शाखेच्या १० आणि परिमंडळ चार मधील पाच पोलीस पथकांनी या दुहेरी हत्याकांडाची चौकशी सुरू केली आणि १२ तासांच्या आतच या थरारक हत्याकांडाचा छडा लावून गणेश शाहू या मुख्य आरोपीला अटक केली. तब्बल तीन ते चार तास पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या शाहूने अखेर पोलिसांपुढे नांगी टाकून हत्येचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
शनिवारी सायंकाळी ५.३० ते ५.४५ च्या दरम्यान उषाताई त्यांची नात राशी हिला कडेवर घेऊन गणेश शाहूच्या किराणा दुकानात आल्या. गणेश शाहूकडे त्यांचे भिसीचे सात हजार रुपये होते. ते देण्यासाठी तो अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत होता. उषातार्इंनी सात हजार रुपये मागताच त्याने पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त उषाताईने त्याची ग्राहकांसमोरच खरडपट्टी काढली. परिणामी खुनशी स्वभावाच्या शाहूसोबत त्यांचा वाद झाला.
आज तुमचा हिशेबच करतो
ग्राहकांसमोर उषातार्इंनी कानउघाडणी केल्याची बाब मनाला लावून घेत आरोपी शाहूने उषातार्इंना ‘वरच्या माळळ्यावर चला, आज तुमचा हिशेबच करतो’, असे म्हणत आपल्या पहिल्या माळ्यावरच्या शयनकक्षात नेले. तेथे त्याने गाफील अवस्थेतील उषातार्इंचे केस पकडून त्यांचे डोके तीनदा भिंतीवर आदळले.
रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या अन् उषाताई खाली कोसळल्या. त्यानंतर शाहूने धारदार टिनाच्या पात्याने उषातार्इंचा गळा कापला. दरम्यान, चिमुकली राशी खाली पडून रडू लागली. त्यामुळे क्रूरकर्मा शाहूने राशीच्या तोंडात रुमाल कोंबला. परिणामी तो चिमुकला जीव अस्वस्थ झाला. ती आचके देत असल्याचे पाहून आरोपीने गळा कापून चिमुकल्या राशीलाही संपवले.
कबुलीजबाबात संभ्रम
आरोपीने गुन्हा घडल्यापासून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. आपण सात हजार रुपये दिल्यानंतर उषाताई कुणासोबत तरी मोठमोठ्याने बोलत (वाद करीत) दुकानातून निघून गेल्याचे त्याने अटक करण्यापूर्वी पोलिसांना सांगितले होते. त्याच्या घरात रक्ताचे डाग आढळल्यानंतर आणि पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सात हजाराच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड केल्याचे तो सांगत आहे. मात्र, हत्या केल्यानंतर आरोपी शाहूने राशी आणि उषातार्इंचा मृतदेह नाल्यात फेकताना त्याने उषातार्इंच्या जवळची पर्स ज्यात १२९० रुपये आणि सोन्याचे दागिने जसेच्या तसे पोत्यात भरून मृतदेहासोबत फेकून दिले. त्यामुळे सात हजारांच्या वादातून हत्या केल्याचा त्याचा कबुलीजबाब पोलिसांसाठी संभ्रम वाढवणारा ठरला आहे.
दुसरे म्हणजे, सायंकाळी ५.४५ च्या सुमारास आजी-नातीची हत्या केल्याचे तो सांगतो आणि रात्री ९.३० च्या सुमारास एक्सयूव्ही कारमध्ये मृतदेह भरून नाल्यात फेकल्याचेही शाहूने पोलिसांना सांगितले आहे. मृत उषाताई जाडजूड शरीरयष्टींच्या होत्या. त्यांचे वजन ७५ किलोंपेक्षा जास्तच असावे. शाहूचे घर आणि दुकान मुख्य मार्गाला लागून आहे. तेथे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मोठी वर्दळ असते. अशात रात्री ९.३० वाजता त्याने मृतदेह पोत्यात भरून ते वाहनात ठेवले अन् वर्दळीच्या भागातून नेऊन नाल्यात फेकल्याची त्याची माहिती पोलिसांना पटणारी नाही. यासोबतच अनेक प्रश्नांच्या उत्तरात तो खोटी माहिती देत आहे. त्यामुळे पोलीस त्याची अन् अन्य आरोपींची स्वतंत्र चौकशी करून या हत्याकांडातील वास्तव शोधण्याचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, शाहूसोबत असलेले दोन संशयित शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
फॉरेन्सिकची टीम सक्रिय
या थरारक हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी रविवारपासूनच सुरू केले. फॉरेन्सिक एक्सपर्टस्ची चमू रविवारी दुपारपासून सक्रिय आहे. आरोपीच्या घरातील रक्ताचे डाग, कपडे, टेरेसवर जाळलेले पडदे, चादर तसेच रक्ताचे डाग मिटविण्यासाठी वापरलेले कपडे तपासले. आरोपी शाहूने पुरावे नष्ट करण्यासाठी वापरलेली कार, शस्त्र तसेच अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. कारमध्येही रक्ताचे डाग, रक्तमिश्रित माती तसेच अन्य पुरावे मिळाले आहेत.
खुर्चीवर आणला मृतदेह?
उषाताई यांचे वजन बघता त्यांना हात-पाय पकडून वरच्या माळ्यावरून खाली आणण्याचे काम पाच ते सहा व्यक्तींशिवाय शक्य नव्हते. त्यामुळे आरोपींनी त्यांचा मृतदेह खुर्चीला बांधला. डोक्यावरून पोटापर्यंतचा भाग पोत्याने झाकला आणि तो वरच्या माळ्यावरून खाली आणल्याचे सांगितले जाते. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना आपले पाप दिसू नये म्हणून आरोपीने दुकानाच्या काठावर त्याची एक्सयूव्ही कार लावली होती. दार उघडताच खुर्चीवरून मृतदेह कारमध्ये कोंबला अन् नाल्याकडे नेला.
शोकसंतप्त परिसर, प्रचंड बंदोबस्त
शांत समजला जाणारा पवनपुत्रनगर परिसर या थरारक हत्याकांडामुळे शोकसंतप्त झाला आहे. जमावाच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून पोलिसांनी रविवारी दुपारपासूनच या भागात प्रचंड बंदोबस्त लावला. शीघ्र कृती दलाची एक तुकडी आरोपीच्या घरासमोर तैनात करण्यात आली. सोमवारी दुपारी २ च्या सुमारास चिमुकली राशी आणि उषातार्इंचा मृतदेह मेडिकलमधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. त्यातील अनेकांच्या भावनांचा बांध फुटला. अनेक महिला अक्षरश: ओक्साबोक्सी रडत होत्या. पत्नी आणि नात गमावलेले सेवकदास कांबळे, मुलगी आणि आई गमावलेला रविकांत तसेच मुलगी अन् आईसमान सासू गमावलेली रूपाली या तिघांचा आक्रोश बघवला जात नव्हता. अंत्यदर्शनाला पोहोचलेले नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे, शनिवारी मध्यरात्रीपासून या प्रकरणाच्या तपासात स्वत: सक्रिय असलेले परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींनी शोकग्रस्त कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
आरोपींना फाशी द्या
दुपारी ३ च्या सुमारास दिघोरी घाटावर चिमुकल्या राशीचा दफनविधी करण्यात आला. त्यानंतर उषातार्इंना भडाग्नी देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत स्थानिक नेते, पत्रकार आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. यावेळी झालेल्या शोकसभेत आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री नितीन राऊत, जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे, ज्येष्ठ पत्रकार राजेश्वर मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा कमी आहे, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करून आरोपींविरुद्ध हत्येसोबतच विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा पर्याय शोधला. अपहरणाचा गुन्हा दाखल करावा की नाही, यासंबंधानेही चर्चा झाली. त्यावर विधी अधिकाऱ्याचेही मत घेण्यात आले. त्यानंतर तो आरोप बाजूला ठेवून पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता हा तपासही सहायक पोलीस आयुक्त किशोर सुपारे यांना सोपविण्यात आला. याप्रकरणी उपरोक्त चार आरोपींव्यतिरिक्त रात्री आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.