नागपुरात सक्रिय रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:44+5:302021-06-03T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल व मे महिन्यात ७० हजाराहून अधिक गेलेली सक्रिय रुग्णसंख्या आता बरीच कमी झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल व मे महिन्यात ७० हजाराहून अधिक गेलेली सक्रिय रुग्णसंख्या आता बरीच कमी झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही पाच हजाराच्या जवळपास आली होती. पुढील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी होईल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात २०४ नवे बाधित आढळले. जिल्ह्यातील बाधितांची टक्केवारीदेखील घटली असून, आकडा दीड टक्क्यांवर आला आहे.
बुधवारी जारी झालेल्या अहवालानुसार, नागपूर शहरात ११७ तर जिल्ह्यात ८४ नवे बाधित आढळले तर, मृत्यूसंख्या ही प्रत्येकी चार इतकी होती. बाहेरील रुग्णांची मृत्यूसंख्या लक्षात घेतली तर, बुधवारी जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १६३ इतकी होती. यातील ३ हजार ३२० रुग्ण शहर तर, १ हजार ८४३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यातील १ हजार ८२९ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल असून, ३ हजार ३३४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्याची बाधितांची टक्केवारी १.५२ टक्के इतकी होती. शहरातील टक्केवारी १.२१ टक्के तर, ग्रामीणमधील २.२३ टक्के इतकी होती. आतापर्यंत ४ लाख ६० हजार ९२४ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील ३ लाख २३ हजार ३२८ रुग्णांचा समावेश आहे.
चाचण्यांची संख्या वाढली
नागपूर जिल्ह्यात बुधवारी चाचण्यांची संख्यादेखील वाढली. २४ तासात १३ हजार ४१९ चाचण्या झाल्या. शहरात ९ हजार ९६० तर ग्रामीण भागात ३ हजार ५७९ चाचण्या झाल्या.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १३,४१९
शहर : ११७ रुग्ण व ४ मृत्यू
ग्रामीण : ८४ रुग्ण व ४ मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७५,०१२
एकूण सक्रिय रुग्ण : ५,१६३
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६०,९२४
एकूण मृत्यू : ८,९२५