नागपूर जिल्ह्यात दरवर्षी वाढतेय बोअरवेलची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:57 AM2019-04-29T10:57:14+5:302019-04-29T10:58:24+5:30

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजारावर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे.

Number of borewells increasing every year in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात दरवर्षी वाढतेय बोअरवेलची संख्या

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी वाढतेय बोअरवेलची संख्या

Next
ठळक मुद्दे६०० फुटावर गेली पाण्याची पातळी नादुरुस्त बोअरवेलकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजारावर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. कधी २५० ते ३०० फुटावर पाणी लागायचे. आता त्याच ठिकाणी ६०० ते ७०० फुटावर पाणी लागत आहे. टंचाई निवारणार्थ दरवर्षी बोअरवेलची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात भूजलाची पातळी खोल गेली आहे.
उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. त्यामुळे पाणी टंचाईला सुरुवात होते. प्रशासन दरवर्षी टंचाई निवारणार्थ आराखडा तयार क रते. यात उपाययोजनात्मक तरतुदीमध्ये सर्वाधिक बोअरवेलचा समावेश असतो. जिल्ह्यात १३ पंचायत समिती अंतर्गत सुमारे ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५५० वर गावे येतात. दरवर्षी जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा सुमारे ३० कोटीच्या घरात असतो तर दुसरीकडे दिवसेंदिवस जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बोअरवेल खोदकामांची संख्या दुपटीने वाढत चालली आहे. जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ८३०० च्या वर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाण्याची मागणी व जमिनीतील पाण्याचा उपसाही हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी ही घटत चालली आहे. आताच भूजलातील पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, तर पुढील काही वर्षात पाण्याची समस्या ही आणखी तीव्र प्रमाणात भेडसावणार आहे.

चालू वर्षात ३९४ बोअरला मंजुरी १५ टक्के पूर्ण
दरवर्षी नव्याने बोअरवेल खोदण्यापेक्षा निर्लेखित केलेल्या बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करुन बोअरमधील गाळ कचरा साफ करुन बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा हा मर्यादित राहील. यासोबतच नव्याने बोअरवेल करण्याची गरज न भासता आहे त्या बोअरवेलच्याच माध्यमातून गावातील जनतेला पाण्याचा सुरळीत पुरवठा करता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीला मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम पंचायतींनी दरवर्षी आपल्या गावातील बोअरवेलचे फ्लशिंग करण्याचे नियोजन केल्यास, त्या जुन्याच बोअरमधून गावाची पाण्याची गरज भागेल व नवीन बोअरवेल करण्याची गरज भासणार नाही. यामुळे भूजल पातळीही घटणार नसल्याचे तज्ञांचे म्हणने आहे.

झमकोली गावात प्रयोग ठरला यशस्वी
उपलब्ध बोअरवेल ड्राय झाली असल्यास तिच्या शेजारी १०० फुटाचे नवीन बोअर तयार करून त्यामध्ये स्लॉटेड पाईप सोडल्यास उपलब्ध बोअरमधून पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. हा प्रयोग जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील झमकोली गावात यशस्वी ठरला आहे. हाच प्रयोग जिल्ह्यातील इतरही गावात राबविल्यास तो यशस्वी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Number of borewells increasing every year in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.