‘कार्ड’धारकांची संख्या वाढली, औषधोपचारावरील खर्च मात्र घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:13+5:302021-03-09T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाच्या वर्षात ‘सीजीएचएस’मधील (सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम) कार्डधारकांची संख्या वाढली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाच्या वर्षात ‘सीजीएचएस’मधील (सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम) कार्डधारकांची संख्या वाढली. मात्र सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांच्या औषधोपचाराच्या खर्चामध्ये मात्र घट झाली आहे. २०१९-२० मध्ये दर महिन्याला ५ कोटी ४१ लाख रुपये खर्च होत होते. २०२०-२१ च्या पहिल्या नऊ महिन्यात हा आकडा प्रति महिना ३ कोटी ७८ लाख इतकाच होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘सीजीएचएस’च्या नागपूर कार्यालयाकडे अर्ज केला होता. १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ‘सीजीएचएस’चे किती ‘कार्ड’धारक होते, त्यांच्या व कुटुंबीयांच्या उपचारांवर किती रुपयांचा निधी खर्च झाला, किती रुपयांची औषध खरेदी करण्यात आली, कोरोनाच्या उपचारांवर किती खर्च झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. २०१९-२० या वर्षात ‘सीजीएचएस’चे ३१ हजार ६१६ ‘कार्ड’धारक होते. २०२०-२१ मध्ये पहिल्या नऊ महिन्यातच ही संख्या ३१ हजार ८७८ वर गेली. मात्र त्यातुलनेत उपचारांवरील खर्च मात्र वाढला नाही. २०१९-२० मध्ये एकूण खर्च ९७ कोटी ५४ हजार २ हजार ३०६ रुपये इतका होता. २०२०-२१ च्या नऊ महिन्यात हा खर्च ६० कोटी ३४ लाख ३० हजार ७२१ इतका झाला. २०१९-२० मधील प्रत्येक कार्डधारकावर सरासरी ३० हजार ८५१ रुपये खर्च झाले, तर या वर्षात हा आकडा १८ हजार ९२९ इतकाच होता.
केवळ उपचारांवरील खर्चदेखील घटला
केवळ कार्डधारक व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारावर २०१९-२० मध्ये प्रति महिना ५ कोटी ४१ लाख २९ हजार १२७ रुपये खर्च करण्यात आले होते. तर २०२०-२१ मध्ये नऊ महिन्यात हाच खर्च प्रति महिना ३ कोटी ७८ लाख ३७ हजार २२९ इतका होता.
औषधांवर ३० टक्के खर्च
२०१९-२० मध्ये औषधांवर ३३ कोटी ९३ लाख ९८ हजार ३९३ रुपये खर्च झाले होते. एकूण खर्चापैकी ही टक्केवारी ३४.८० टक्के इतकी होती. तर २०२०-२१ मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत औषधांवर १८ कोटी २६ लाख ८३ हजार ८१४ रुपये खर्च झाले व एकूण खर्चाच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ३०.२७ टक्के इतकी होती. ‘कार्ड’धारकांच्या कोरोनावरील उपचारावर ‘सीजीएचएस’चे १ कोटी ६२ लाख ५९ हजार ९७२ रुपये खर्च झाले.
उपचारांवरील प्रति महिना खर्च
वर्ष - खर्च
२०१७-१८ -३,८५,६४,८३६
२०१८-१९-३,७७,४८,१६५
२०१९-२०-५,४१,२९,१२७
२०२०-२१ (डिसेंबरपर्यंत) - ३,७८,३७,२२९
‘सीजीएचएस’चा एकूण खर्च
वर्ष - कार्डधारक - एकूण खर्च
२०१७.१८ - २८,७१२ - ७८,३०,२८,९१०
२०१८.१९ - ३०,४५४ - ७६,३६,८२,६६८
२०१९.२० - ३१,६१६ - ९७,५४,०२,३०५
२०२०.२१ (डिसेंबरपर्यंत) - ३१,८७८ - ६०,३४,३०,७२१