सहकारनगर घाटावर कोरोनाबाधितांचा आकडा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:42+5:302021-04-28T04:07:42+5:30
नागपूर : शहरातील सहकारनगर घाटावर सध्या कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्काराचा आकडा मोठा दिसत आहे. या घाटावर कोरोना नसतानाच्या काळात रोज सरासरी ...
नागपूर : शहरातील सहकारनगर घाटावर सध्या कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्काराचा आकडा मोठा दिसत आहे. या घाटावर कोरोना नसतानाच्या काळात रोज सरासरी ४ ते ५ अंत्यसंस्कार व्हायचे. आता ही संख्या २५ ते ३० पर्यंत पोहचली आहे. यामुळे नंबर लावून अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथेही आली आहे.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सदर प्रतिनिधीने घाटावर भेट दिली असता, तीन मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत दिसले. काही चिता भडकत होत्या. घाटावरील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे अलीकडे अंत्यसंस्कारासाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहाची संख्या वाढली आहे. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत २१ अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात ११ कोरोना संक्रमित होते. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १० प्रेतांची अंत्यसंस्कारासाठी नोंद झाली होती. त्यातील ८ मृतदेह कोरोना संक्रमित होते. शववाहिकेमधून आवरणात बंद केलेले मृतदेह आणणे सुरूच होते. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार सुरू होते, तर नंबर न लागलेले नातेवाईक वाट बघत होते.
अंत्यसंस्कारासाठी ओटे कमी पडत असल्याने येथे सध्या तात्पुरते पक्क्या ओट्यांच्या मध्ये विटांचे कच्चे ओटे तयार करण्यात आले आहेत. त्यावर अग्नी दिला जात आहे. एरवी रात्री ८ ते ९ नंतर बंद होणारा हा घाट आता रात्री १०.३० नंतरही आगीच्या ज्वाळांनी भडकतच असतो.