उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या ३०० च्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:36 PM2020-05-10T22:36:11+5:302020-05-10T22:37:35+5:30
कोरोनाविरोधात नागपूरकरांचा लढा सुरू असलातरी रुग्णांची संख्या ३०० पर्यंत पोहचली आहे. रविवारी पुन्हा १३ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या २९६ झाली असून ३०० कडे वाटचाल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाविरोधात नागपूरकरांचा लढा सुरू असलातरी रुग्णांची संख्या ३०० पर्यंत पोहचली आहे. रविवारी पुन्हा १३ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या २९६ झाली असून ३०० कडे वाटचाल आहे. आज नऊ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ९२ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सध्या उपचार घेत असलेल्या १९६ रुग्णांमधून १८६ रुग्णांना लक्षणे नाहीत. केवळ १० रुग्णांनाच सौम्य प्रकारची लक्षणे आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या आमदार निवासातील नमुन्यातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमीनपुरा रहिवासी ६२, ३६ व २२ वर्षीय महिला आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेने ८५ नमुने तपासले. यवतमाळ जिल्ह्यातील एक तर नागपुरातील दोन नमुने पॉझिटिव्ह आले. यात मोमीनपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष तर ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे दोघेही आमदार निवासात क्वारंटाईन होते. या शिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत काल रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात १८, ३०, ३८ वर्षीय महिला तर ९ वर्षीय मुलगा २०, २२, ३० वर्षीय पुरुष आहेत. याशिवाय रात्री एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे सर्व मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत. यांना वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.
-एक वर्षाच्या मुलाने केली कोरोनावर मात
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या सतरंजीपुरा येथील एक वर्षीय मुलाने कोरोनावर मात केली. या मुलासोबत त्याची आई थांबलेली होती. सलग १४ दिवसाच्या उपचारानंतर त्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. त्याला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सोबतच सतरंजीपुरा येथील १८ वर्षीय तरुणीचेही नमुने निगेटिव्ह आल्याने तिला होम क्वारंटाईन करण्यात आले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) आज सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. या रुग्णामध्ये २९, ३०, ५२, ५५, ६५ वर्षीय पुरुष तर ३५ व ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
यातील चार सतरंजीपुरा, दोन मोमीनपुरा व एक शांतिनगर येथील आहेत़ वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी या सातही रुग्णांची तपासणी केल्यानंतर रुग्णालयातून सुटी दिली.
केवळ १० रुग्णांना लक्षणे
मेयोच्या कोविड वॉर्डात आतापर्यंत १३१ रुग्ण भरती झाले असून यातील ४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात दोन रुग्णांचा मृत्यू आहे. सध्या रुग्णालयात ८२ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ८० रुग्णांना कुठलीही लक्षणे नाहीत. केवळ एका रुग्णाला लक्षणे असून त्याकडे डॉक्टरांचे लक्ष आहे. मेडिकलमध्ये आतापर्यंत १५९ रुग्ण भरती झाले असून यातील ४५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. सध्या ११४ रुग्ण उपचार घेत असून यातील १०५ रुग्णांना कुठलीही लक्षणे नाहीत. केवळ नऊ रुग्णांना लक्षणे आहेत. एकूण १९६ मधून केवळ १० रुग्णांना लक्षणे असून १८६ रुग्णांना लक्षणेच नाहीत.
अमरावती येथील मृतदेहाचा नमुना पॉझिटिव्ह
परसापूर, अमरावती येथील ४१ वर्षीय रुग्णाला शनिवारी मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले जात असताना शनिवारी वाटेतच मृत्यू झाला. या मृताला गेल्या सहा दिवसापासून सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास होता. मेडिकलच्या प्रयोगशाळेत मृताच्या नमुना अहवाल आज पॉझिटिव्ह आला.