बँकेच्या कस्टमर केअरवर सायबर गुन्हेगारांचा नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:41+5:302021-08-18T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बँकेच्या कस्टमर केअरवर सायबर गुन्हेगाराने आपला नंबर नमूद करून ठेवला आहे. सोमवारी हा धक्कादायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बँकेच्या कस्टमर केअरवर सायबर गुन्हेगाराने आपला नंबर नमूद करून ठेवला आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याच्या मुलीच्या खात्यातून अशा प्रकारे सायबर गुन्हेगाराने सात लाख रुपये लंपास केले. बजाजनगर पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. श्रीराम माधवराव करपटे (वय ६९) हे संतनगर बजाजनगरात राहतात. ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी असून त्यांची मुलगी अमेरिकेत राहते. करपटे यांना पाण्याचे बिल भरायचे होते. त्यासाठी स्वत:च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्यांनी १६ ऑगस्टला मोबाईलमधून ऑनलाईन बिल पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. व्यवहारात अडचण येत असल्याने त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरवर फोन केला. नमूद नंबरवर संपर्क केला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने करपटे यांना दुसऱ्या मोबाईल नंबरवर बोलायला सांगून तुम्ही तुमच्या मुलीच्या डेबिट कार्डमधून बिल पेमेंट करण्याचा सल्ला दिला. करपटे यांची मुलगी अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्यांचे एनआरआय बँक खाते आहे. करपटे यांना धोका लक्षात आला नाही. त्यामुळे त्यांनी तसेच केले. काही वेळेतच सायबर गुन्हेगारांनी करपटे यांच्या मुलीच्या खात्यातून चार लाख रुपये काढून घेतले.
---
पोलीस ॲक्टीव्ह होण्यापूर्वीच दुसरा धक्का
मुलीच्या खात्यातून चार लाखांची रोकड काढून घेण्यात आल्याचे लक्षात येताच सोमवारी सायंकाळी करपटे यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची सायबर सेलमध्ये नोंद करण्यात आली. ते खाते ‘नॉन ऑपरेशनल’ करण्यात आले. आश्चर्य म्हणजे सायबर गुन्हेगारांनी त्याच खात्यातून पुन्हा तीन लाख रुपये काढून घेतल्याचा मेसेज करपटे यांना मंगळवारी सकाळी आला. पोलिसांकडे माहिती दिल्यानंतर बजाजनगरच्या पीएसआय पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----