जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:01 AM2021-11-10T00:01:43+5:302021-11-10T00:02:33+5:30

अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत.

The number of fatal accidents in the district is serious | जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

Next

नागपूर- जिल्ह्यात अनेक महामार्ग असून, गावोगावचे रस्तेही चांगले आहेत. त्यामुळे जीवघेण्या अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. हे अपघात कमी करून निरपराध्यांचे सोन्यासारखे जीव वाचविण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मगर यांनी पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून एक महिना झाला आहे. या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गुन्हे, गुन्हेगारीचे स्वरूप आणि पोलिसांच्या उपाय योजना या संबंधाने लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी आज चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारी नियंत्रित करणे, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राखणे, दोषसिद्धता वाढविणे, ही पोलिसांची जबाबदारीच आहे. ती आम्ही पार पाडणारच आहोत.

याच बरोबर दोष नसताना दुसऱ्याच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघातात निरपराधांना आपला जीव गमवावा लागतो. नागपूर जिल्ह्यात जीवघेण्या अपघाताची संख्या चिंताजनक आहे. २०२० मध्ये झालेल्या २३१ अपघातांत २४४ जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारी ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत ३१९ अपघातांत ३३५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश तरुण होते. अपघातात एखाद्याचा बळी जात असला, तरी त्याच्या मृत्युमुळे ते संपूर्ण कुटुंबच विस्कळीत होते. आयुष्यभर न भरून निघणारी हानी त्या कुटुंबाची होत असते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील जीवघेणे अपघात कमी करण्याला आपण सर्वोत्तम प्राधान्य देणार असल्याचे मगर म्हणाले.

स्वतंत्र पोलीस पथके तयार करणार -
अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत. या पथकांकडे फक्त अपघात रोखण्याचीच जबाबदारी राहणार आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताचे स्थळ (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून तेथे आवश्यक उपाययोजना केल्या जाईल. या जीवनदायिनी उपक्रमासाठी हायवे पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची मदत घेणार आहोत. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्टेट हायवे पोलीस) डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी आपली चर्चा झाली असून, या उपक्रमाला आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणार आहे.

जिल्हा परिषदेची मदत घेणार -
जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर वेगवेगळी पथके तयार करून त्यांना या उपक्रमात जोडण्याचा विचार आहे. या पथकांकडून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जाईलच. मात्र, अपघातच होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यायची, या संबंधीचे जनजागरण आम्ही करणार आहोत. या उपक्रमातून गावोगावचे सोन्यासारखे जीव वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात आम्हाला सर्वांची साथ आणि यश मिळेल, असा विश्वासही विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला.

महिला-मुलींसंबंधीचे गुन्हे रोखणार
महिला-मुलींसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठीही ग्रामीण पोलीस प्राधान्याने प्रयत्न करतील. १३ ते १८ या वयोगटांतील मुली बेपत्ता होण्याचे (पळून जाण्याचे) प्रमाण लक्षणीय आहे. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, या वयातील मुलींसाठी शाळा-महाविद्यालयात महिला पोलिसांची स्वतंत्र पथके समुपदेशन वर्ग घेऊन त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाण व्हावी, धोके कळावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्त्री असो, मुलगी असो अथवा मुलगा. तो जर सतर्क असेल, तर गुन्हा घडत नाही. यासाठी प्रत्येकाला सतर्क करण्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत.

Web Title: The number of fatal accidents in the district is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.