Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 16:24 IST2022-08-26T16:24:07+5:302022-08-26T16:24:28+5:30
मेडिकलमधील स्वाइन फ्लूचा वॉर्ड फुल्ल, स्क्रब टायफसच्या आठ रुग्णांची नोंद

Nagpur | कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूसह 'स्क्रब टाईफस'ने वाढवली चिंता
नागपूर : एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे स्वाइन फ्लूसह स्क्रब टायफसनेही डोके वर काढले आहे. तीन दिवसात स्वाइन फ्लूचे ६७ रुग्ण आढळून आले, तर स्क्रब टायफसच्या सात रुग्णांची नोंद झाली. यातील दोन रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
‘चिगर माइट्स’मधील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने ‘स्क्रब टायफस’ होतो. उंदरामुळे वाढणाऱ्या या आजाराचे २०१८ मध्ये २९ बळी, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. २०१९ मध्ये एक मृत्यू व २२ रुग्णांची नोंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजाराचे फारसे रुग्ण दिसून आले नाही. परंतु आता पुन्हा रुग्ण वाढताना दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत पाच, तर ग्रामीण भागात दोन असे एकूण सात रुग्णांची नोंद झाली. यातील दोन रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्वाइन फ्लूचे १२२ रुग्ण भरती
गुरुवारी दिवसभरात स्वाइन फ्लूच्या १९ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ३४६ झाली असून, दहा मृत्यू आहेत. यातील १९१ रुग्ण शहरातील, तर १५५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे, शहर आणि ग्रामीण मिळून १२२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मेडिकलमध्ये स्वाइन फ्लू रुग्णांसाठी असलेला १३ क्रमांकाचा वॉर्ड फुल्ल झाला आहे. मेयो व महानगरपालिकेच्या रुग्णालयात या रुग्णांसाठी वॉर्डच नाही. यामुळे रुग्ण अडचणीत आले आहेत.
कोरोनाचे ३५ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सध्या कोरोनाचे ३९६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील ३६४ रुग्ण गृहविलगीकरणात तर ३२ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत.