तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले
By admin | Published: October 5, 2015 02:50 AM2015-10-05T02:50:19+5:302015-10-05T02:50:19+5:30
शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे.
विसर्जनानंतर वाढले प्रदूषण : मासे मृत्युमुखी पडायला सुरुवात
नागपूर : शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे. नागपुरातील एका पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या तलावाच्या तपासणीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे गांधीसागर तलावात मासे मृत्युमुखी पडायला सुरुवात झाली आहे.
गणेश विसर्जनापूर्वी नागपूर महापालिका व पर्यावरणवादी संस्थांनी तलावाच्या संरक्षणासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु भक्तांच्या श्रद्धेपोटी तलावांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आले. मूर्ती विसर्जन व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणात तलाव प्रदूषित झाले आहेत. नागपुरातील ग्रीन विजील या संस्थेने विसर्जनापूर्वी तलावाच्या प्रदूषणाची मोजणी केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा शहरातील तीन मुख्य तलावाच्या पाण्याची तपासणी केली. या तपासणीत त्यांनी तलावातील पाण्याचे तापमान, पाण्याचा ‘पीएच’ ज्यात पाण्यात आम्लता व क्षारचे प्रमाण, पाण्यातील गढुळपणा ‘टर्बिडीटी’ आणि पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण याची तपासणी केली. संस्थेच्या चमूने सोनेगाव, गांधीसागर व फुटाळा तलावाच्या पाण्याचे नुमने घेतले. या नमुन्याच्या तपासणीअंती अतिशय धोकादायक निष्कर्ष पुढे आले. या तपासणीत संस्थेच्या सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, कुमारेश टिकाधर, आकाश शेंडे, नेहा चावला, भाग्यश्री वाकडे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
तलावातील जैवविविधतेला धोका
तपासणीअंती अतिशय धक्कादायक चित्र समोर आले आहे. पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने तलावातील जैवविविधतेला धोका आहे. सोनेगाव तलावात यंदा विसर्जनास बंदी असल्याने या तलावावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र फुटाळा व गांधीसागर तलावात धोक्याची पातळी गाठली आहे. पिण्याच्या पाण्याचा पीएच ७ ते ७.२ असतो. मात्र तलावाच्या पाण्याचा पीएच ८ च्या वर गेला आहे. त्यामुळे क्षारचे प्रमाण वाढले आहे. तलावाच्या प्रदूषणाचा हा संपूर्ण डाटा वर्ल्ड वॉटर फेडरेशनकडे पाठविण्यात येणार आहे.
-सुरभी जयस्वाल, प्रोजेक्ट को-आॅर्डिनेटर
स्थानिक प्रशासनाने दखल घ्यावी
तलावाच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असतानाही, स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी प्रदूषणाची स्थिती जाणून घेतल्या जाते. दरवर्षी त्याचा आढावाही घेतला जातो. परंतु प्रदूषण महामंडळासारखा विभाग हे गंभीरतेने घेत नाही. साधी तपासणीसुद्धा करीत नाही.
मेहुल कोसुरकर, सदस्य