शहरात ५०० च्या खाली रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:10+5:302021-05-22T04:09:10+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात यश येत असल्याचे चित्र आहे. विशेषत: शहरात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. या ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात यश येत असल्याचे चित्र आहे. विशेषत: शहरात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या खाली आली. शुक्रवारी ४११ रुग्णांची नोंद झाली. शिवाय, पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा एकेरी संख्येत, म्हणजे ८ आला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या अधिक असली तरी, येथेही रुग्णसंख्येत घट होत आहे. ग्रामीणमध्ये आज ५७६ बाधित रुग्ण आले व १२ मृत्यू झाले. एकूणच जिल्ह्यात १००० नवे रुग्ण व ३३ मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस थोपविण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा केली जात आहे. यात कडक निर्बंधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे ८ हजाराजवळ पोहोचलेली रुग्णसंख्या २७ दिवसांत हजारावर आली आहे. आज नागपूर जिल्ह्यात १९,१०९ चाचण्या केल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर ५.२३ टक्के होता. शहरात हाच दर २.८९, तर ग्रामीणमध्ये ११.६९ टक्के होता. १५ मे रोजी ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ४७ टक्क्यांवर गेले होते. तेही आता हळूहळू कमी होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर १.८५ टक्के आहे.
- शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक रुग्ण बरे
नागपूर जिल्ह्यात ३,१५९ रुग्ण बरे झाले. यात शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये अधिक रुग्ण बरे होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात १३६२, तर ग्रामीणमध्ये १७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९४.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ४,४३,१५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णसंख्येतही घट
एप्रिल महिन्यात घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात होती. ती शुक्रवारी १२,२५५ वर आली आहे. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटर मिळून ४,७९९ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट आली. शुक्रवारी जिल्ह्यात १७,०५४ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण नोंदविण्यात आले.
: कोरोनाची गुरुवारची स्थिती...
दैनिक चाचण्या : १९,१०९
शहर : ४११ रुग्ण व ८ मृत्यू
ग्रामीण : ५७६ रुग्ण व १२ मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,६८,९३१
ए. सक्रिय रुग्ण : १७,०५४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,४३,१५९
ए. मृत्यू : ८,७१८