मेयो ओपीडीतील रुग्णांची संख्या निम्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 08:56 PM2020-09-30T20:56:20+5:302020-09-30T20:57:56+5:30
कोरोनाच्या उपचारामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो इस्पितळ) सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मात्र मेयोमध्ये येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत कोरोनामुळे बरीच घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मेयोमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो इस्पितळ) सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मात्र मेयोमध्ये येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत कोरोनामुळे बरीच घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मेयोमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झाली आहे. २०२० मध्ये दर महिन्याला सरासरी ३० हजार रुग्णच मेयोमध्ये पोहोचले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मेयो इस्पितळाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत मेयोमधील बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागात किती रुग्ण पोहोचले, कोरोनाचे किती रुग्ण होते, कोरोनाग्रस्तांसाठी किती रक्कम खर्च झाली व औषधांचा खर्च किती होता इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१९ साली मेयोतील बाह्यरुग्ण विभागात ७ लाख २७ हजार ८७ रुग्ण आले व दर महिन्याची सरासरी ही ६० हजार ५९० रुग्ण इतकी होती. तर २०२० मध्ये दर महिन्याची रुग्णांची सरासरी ही २९ हजार २४५ इतकी होती.
२०१९ मध्ये मेयोमध्ये २ हजार २५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर जानेवारी ते आॅगस्ट २०२० या कालावधीतील ही संख्या १ हजार ४६६ इतकी होती.
कोरोनाच्या १२ टक्के रुग्णांचा मृत्यू
मेयोमध्ये ३० ऑगस्टपर्यंत ३ हजार ७१४ कोरोनाबाधित दाखल झाले. त्यात १,४२८ महिला व १९० पुरुषांचा समावेश होता. बाधितांपैकी २,४५५ जणांना सुटी झाली तर ४५३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची ही टक्केवारी १२ टक्के इतकी आहे.