विदर्भात रुग्णसंख्या मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:52 AM2020-10-06T11:52:20+5:302020-10-06T11:55:00+5:30
Corona Nagpur News सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमीकमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली, परंतु ऑगस्ट महिन्यापासून वेग धरला होता. रुग्णांची संख्या दोन ते तीन हजारांच्या घरात जात होती. परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमीकमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. मृत्यूचा दरही कमी झाला आहे. सोमवारी १,४६७ रुग्ण व ५८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,५८,१६९ तर मृतांची संख्या ४,१७५ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रुग्णांची नोंद हजाराच्या आत होत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज ७४६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ८२,२०७ तर मृतांची संख्या २,६५९ झाली आहे. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली. १२० बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या ७,७६८वर गेली.
अमरावती जिल्ह्यात ११९ रुग्णांची नोंद झाली असून पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. रुग्णसंख्या १४,१२४ तर बळींची संख्या ३१६ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ९७ बाधित रुग्ण तर तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ६,०८७ तर मृतांची संख्या १३९ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या शंभरीच्या आत आली. ९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. परंतु सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ११,११८ तर मृतांची संख्या ७४ झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ८० रुग्ण व एका रुग्णाच्या मृत्यूची भर पडली. वर्धा जिल्ह्यात ७४ रुग्ण व तीन मृत्यूची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात ६९ रुग्ण आढळून आले. वाशिम जिल्ह्यात ५३ रुग्ण व एका रुग्णाचा बळी गेला. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या मंदावली, १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. परंतु मृत्यूसत्र सुरूच असून दोन रुग्णांचे जीव गेले. विशेष म्हणजे, सर्वात कमी रुग्णांची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. केवळ चार रुग्ण पॉझिटिव्ह आले.