विदर्भात रुग्णांची संख्या ६९ हजारावर; २९२३ नवे रुग्ण तर ६४ मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 09:44 PM2020-09-05T21:44:41+5:302020-09-05T21:45:46+5:30
विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत चालला आहे. शनिवारी २९२३ नव्या रुग्णांची भर पडली तर ६४ मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत चालला आहे. शनिवारी २९२३ नव्या रुग्णांची भर पडली तर ६४ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ६९७०३ झाली असून मृतांची संख्या १९१७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज नागपुरात पुन्हा १७०० वर रुग्णांची संख्या गेली. सात जिल्ह्यात रुग्णांनी शंभरी गाठली. यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून रोजच्या रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळ जात आहे. आज १७४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या ३८१३९ तर मृतांची संख्या १२६१ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. रुग्णसंख्य ३६४१ झाली असून मृतांची संख्या ४१ वर गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा भयावह पद्धतीने वाढत आहे.
आज सात मृत्यू व १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची एकूण संख्या ४०६३ तर मृतांची संख्या ११५ झाली आहे. अकोला जिल्ह्यात १२७ रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्णाचे बळी गेले. रुग्णसंख्या ४५११ वर पोहचली आहे. आतापर्यंत १६५ बळी गेले आहेत. वर्धा जिल्ह्यात १४० रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. रुग्णसंख्या १६०२ झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात १३८ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची संख्या १८८४ तर मृतांची संख्या ३३ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही मृतांची संख्या वाढत आहे. आज चार मृत्यू व १४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३७५२ झाली असून मृतांची संख्या ५७ वर गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या २१८६ झाली तर एका रुग्णाच्या मृत्यूने बळींची संख्या २८ झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात ७१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ६५८० झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ४४ रुग्ण तर गडचिरोली जिल्ह्यात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली.