उपराजधानीत पॉश भागांमध्ये कुंटणखाने : सेक्स वर्कर्सच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:26 AM2018-07-30T10:26:22+5:302018-07-30T10:27:03+5:30
उपराजधानीतील वारांगनांची वस्ती म्हटले की गंगा जमुनाचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आता ‘सेक्सवर्कर्स’चे जाळे शहरात सर्वच ठिकाणी पसरले आहे. शहरातील ‘सेक्सवर्कर्स’चे प्रमाण दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे.
मेघा तिवारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील वारांगनांची वस्ती म्हटले की गंगा जमुनाचे नाव डोळ्यासमोर येते. मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा वापर करत आता ‘सेक्सवर्कर्स’चे जाळे शहरात सर्वच ठिकाणी पसरले आहे. शहरातील ‘सेक्सवर्कर्स’चे प्रमाण दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे. विशेष म्हणजे या ‘सेक्सवर्कर्स’ शहराच्या आत राहून व्यवसाय करत आहेत.
‘लोकमत’ने शहरातील विविध संस्था तसेच ‘सेक्सवर्कर्स’साठी ग्राहक आणणाऱ्यांशी संपर्क साधला. नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर त्यांनी माहिती पुरविली. अनेक महिला स्वत:ची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे शरीरविक्रयाकडे वळतात. तर काही महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायात आणले जाते. समाजाच्या दृष्टीने त्या अगदी सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचा मूळ व्यवसाय हा शरीरविक्रय हाच असतो. मागील १० वर्षांपासून शहरात शरीरविक्रय करणाऱ्या एका महिलेने तर धक्कादायक माहितीच दिली. नागपूरसोबतच बाहेरील शहरांमध्येदेखील हे जाळे पसरले असून नव्या मुलींना चक्क प्रशिक्षणदेखील देण्यात येते. ‘सेक्सवर्कर’ म्हणून काम करत असताना ओळख नेहमीच लपविल्या जाते. महाविद्यालयात शिकणाऱ्या काही मुलीदेखील शरीरविक्रय करतात व पैशांच्या लोभापायी त्या इकडे वळतात. आमच्यासोबत किंवा हाताखाली काम करणाऱ्या मुलींची खरी नावेदेखील आम्हाला माहीत नसतात, असे तिने सांगितले. यासंदर्भात ‘सेक्सवर्कर्स’साठी काम करणाऱ्या ‘भारतीय आदिम जाती सेवक संघ’च्या किरण निनावे यांना संपर्क केला असता शहरात हे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात ‘सेक्सवर्कर्स’ची संख्या जवळपास दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण वेगाने वाढत असून तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. आमच्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही या महिलांशी संपर्क साधतो व त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करतो. १९ समन्वयकांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो. त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करणेदेखील कठीण असते, असे त्यांनी सांगितले.
‘सेक्सवर्कर’चा मुलगा झाला अभियंता
यावेळी एका ‘सेक्सवर्कर’ची कहाणी तर शहारे आणणारी होती. पतीला अर्धांगवायू झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आली असताना एका परिचित महिलेने धोक्याने या व्यवसायात ढकलले. येथून बाहेर निघणे शक्य नसल्यामुळे मन घट्ट करून काम करावे लागले. मात्र आता माझा मुलगा अभियंता झाला असून आयुष्यात आलेली हीच सुखाची झुळूक आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.
अधिवेशन काळात मागणीत वाढ
यावेळी मिळालेली आणखी एक माहिती तर आणखी धक्कादायक होती. शहरात अधिवेशन काळात ‘सेक्सवर्कर्स’च्या मागणीत जास्त वाढ होते आणि याच कालावधीत नवीन मुली जास्त प्रमाणात आणल्या जातात, अशी माहिती एका महिलेने दिली.