नागपुरात दिवाळीनंतर चाचण्यांची संख्या वाढताच रुग्णंसख्याही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 09:49 PM2020-11-23T21:49:03+5:302020-11-23T21:50:25+5:30
Corona Virus, increased patients after Diwali दिवाळीच्या तोंडावर रुग्णसंख्या कमी होताच अनेकांनी सुटीचा बेत आखला. आजूबाजूच्या पर्यटन स्थळांसह काही इतर जिल्ह्यातील कुटुंबाकडे तर काही पुणे, मुंबईत दाखल झाले. प्रवासानंतर आता काही जण चाचणी करीत असल्याने व बदलत्या वातावरणाचा शरीरावर पडलेल्या प्रभावामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली. परिणामी, रुग्णसंख्याही वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या तोंडावर रुग्णसंख्या कमी होताच अनेकांनी सुटीचा बेत आखला. आजूबाजूच्या पर्यटन स्थळांसह काही इतर जिल्ह्यातील कुटुंबाकडे तर काही पुणे, मुंबईत दाखल झाले. प्रवासानंतर आता काही जण चाचणी करीत असल्याने व बदलत्या वातावरणाचा शरीरावर पडलेल्या प्रभावामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली. परिणामी, रुग्णसंख्याही वाढली आहे. दिवाळीच्या काही दिवसांपर्यंत चार हजाराच्या आत असलेल्या चाचण्यांची संख्या आता सहा हजारावर पोहचली आहे. यामुळे रुग्णसंख्या ३५०ते ४५० दरम्यान गेली आहे.
कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक कुटुंबांनी स्वत:ला घरीच कोंडून ठेवले होते. परंतु कोरोनाचा संसर्ग मंदावताच काही नातेवाईकांच्या भेटीला किंवा आवडीच्या स्थळी गेले. नोकरी व शिक्षणानिमित्त पुणे, मुंबईसह इतर महानगरामध्ये असलेले अनेक लोक घरी परतले. या दरम्यान अनेकांना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वारंवार हात धुण्याच्या त्रिसूत्रीचा विसर पडला. यात भर पडली दिवाळीनंतर बदलेल्या ढगाळ वातावरणाची. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले. यामुळे अपेक्षेनुसार चाचण्यांची संख्या वाढली. दिवाळीच्या दिवसांत २००च्या खाली गेलेली रुग्णसंख्या ३५० ते ४५०वर पोहचली.
जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी आवश्यक
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसरी लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची सक्तीची नोंद व चाचणी बंद असल्याने संसर्ग वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत: पुढाकार घेऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञानी केले आहे.
- नोव्हेंबरमध्ये एकूण चाचण्या-९९३९३
- नोव्हेंबरमध्ये किती पॉझिटिव्ह-६०६२
- आतापर्यंत किती रुग्णांची सुटी-१०११९५
- सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-४०५९
- दिवाळीनंतर टेस्टिंग वाढल्या
दिवाळीच्या चार-पाच दिवसांपूर्वी कोरोना टेस्टिंगची संख्या कमी झाली होती परंतु दिवाळीनंतर बदलत्या वातावरणाचा परिणाम आणि बाहेरून परतलेल्यांनी घेतलल्या काळजीमुळे कोरोना टेस्टिंगची संख्या वाढली. मागील तीन दिवसांत शासकीय रुग्णालयातील कोविड ओपीडीची संख्या २००ने वाढल्याचे येथील वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे.
दिवाळीनंतर घरी परतलेले व बदलत्या वातावरणामुळे सर्दी, पडसे असलेले लोक चाचण्या करीत आहेत. यामुळे चाचण्यांची संख्या वाढली असून रुग्णसंख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनी चाचण्या करणे गरजेचे आहे.
-डॉ. रवी चव्हाण
वैद्यकीय अधीक्षक, मेयो