बोरमधील वाघांची संख्या घटली
By Admin | Published: October 21, 2014 12:55 AM2014-10-21T00:55:39+5:302014-10-21T00:55:39+5:30
वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच टायगर रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या मात्र गत सात वर्षांपासून सतत खाली घसरत असल्याची
धक्कादायक : वन्यजीव विभागाची पोलखोल
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच टायगर रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या मात्र गत सात वर्षांपासून सतत खाली घसरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
माहितीच्या अधिकारात स्वत: पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती प्राप्त केली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गत २००७ मध्ये बोर व न्यू बोर अभयारण्यात एकूण सहा वाघांचा अधिवास होता. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान येथील वाघांची प्रगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या काळातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु २०१२ मध्ये झालेल्या प्रगणेत येथील वाघांची संख्या सहावरून पाचपर्यंत खाली आली आहे. शिवाय २०१४ मध्ये ती पुन्हा खाली घसरून, आता केवळ चार वाघ येथे शिल्लक राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग मात्र मागील दोन वर्षांत बोर व न्यू बोर अभयारण्यात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा ढिंडोरा पिटून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. जर या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासंबंधी एवढी विकास कामे झाली, तर वाघांची संख्या कमी का होत आहे? असा वन्यजीवप्रेमी संघटनांतर्फे सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नागपूरशेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या संख्येत वाढ होऊन, सध्या येथे एकूण चार वाघांचा अधिवास असल्याचे वन्यजीव विभाग सांगत आहे. गत २००७ च्या प्रगणनेनुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकही वाघ नव्हता. परंतु २०१३ मध्ये येथील वाघांची संख्या तीनवर पोहोचली आणि २०१४ मध्ये त्यात पुन्हा एका वाघाची भर पडून ती चार झाली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण २३ वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल आठ वाघांची भर पडली आहे. २०१३ मध्ये येथे एकूण १५ वाघ होते. परंतु आता ती संख्या २३ वर पोहोचली असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)