शहरात वाढतेय वाहनांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:46 AM2017-10-27T01:46:20+5:302017-10-27T01:46:32+5:30

Number of vehicles rising in the city | शहरात वाढतेय वाहनांची संख्या

शहरात वाढतेय वाहनांची संख्या

Next
ठळक मुद्देसाडेचार वर्षांत ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी : कराच्या माध्यमातून शहर ‘आरटीओ’ला ३०१ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाकडे वेगाने अग्रेसर असलेल्या नागपूर शहरात लोकांचे राहणीमानदेखील बदलताना दिसून येत आहे. नवीन वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. २०१३ सालापासून शहरात ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत शहर ‘आरटीओ’ला थोडाथोडका नव्हे तर ३०१ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. यातील ७६ टक्के महसूल हा नवीन वाहनांच्या नोंदणीतून मिळाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ‘आरटीओ’कडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात किती नवीन वाहनांची नोंदणी झाली व त्यांच्यापासून किती कर मिळाला, वंशनिमय या बस कंपनीने किती कर भरलेला नाही, किती वाहनचालकांपासून कर वसूल होऊ शकलेला नाही, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, या कालावधीत शहर ‘आरटीओ’त ८२ हजार ४२४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. याच्या करापोटी ‘आरटीओ’ला २३१ कोटी ८३ लाख ८४ हजार ८२० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. दरम्यान, १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत‘आरटीओ’ला विविध करांच्या माध्यमातून मिळालेला एकूण महसूल हा ३०१ कोटी ५८ लाख ९४ हजार ५९५ रुपये इतका होता.
दरम्यान वंशनिमय या बस कंपनीने १० बसेसचा कर भरलेला नाही. थकीत कराबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे, असे उत्तरात नमूद आहे.

३५ लाखांच्या कराची वसुली नाही
दरम्यान, या कालावधीत २०६ वाहनधारकांनी ‘आरटीओ’चा कर थकविला आहे. कराची रक्कम ही ३५ लाख ९३ हजार ७८८ इतकी आहे. ही वसुली अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान, वेळेवर कर न भरणाºया वाहनचालकांना दर महिन्याला २ टक्के व्याजाप्रमाणे दंड आकारण्यात येतो, असे ‘आरटीओ’ने स्पष्ट केले आहे.

Web Title: Number of vehicles rising in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.