३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:17 PM2019-08-03T23:17:50+5:302019-08-03T23:19:56+5:30
देशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा म्हणून राज्य शासनाने राज्यातील ३४ जिल्ह्यात वनौषधींच्या नर्सरी विकसित करण्याचा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनोगत राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा म्हणून राज्य शासनाने राज्यातील ३४ जिल्ह्यात वनौषधींच्या नर्सरी विकसित करण्याचा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनोगत राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशन आणि सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यावर्षीच्या डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी व स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे, प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतकर, सर्वोदयी विचारवंत मा.म. गडकरी, फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे, विश्वस्त नानाभाऊ समर्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी पुढे बोलताना, गोगुलवार दाम्पत्याने धनसेवा सोडून जनसेवा, आदिवासींची सेवा आणि वनसेवेचे व्रत स्वीकारले आहे. कायदे करून बदल घडत नाही, त्यासाठी मानसिकता बदलावी लागते. या देशाच्या मातीने त्याग, सेवा व मानवता शिकविली आहे. हा बदल घडविण्याचे काम हे दाम्पत्य समर्पित भावनेने करीत आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
लीलाताई चितळे यांनी वर्तमान परिस्थितीबाबत रोखठोक मत मांडले. आज विरोधात बोलणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून हे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. ही भीती दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आश्वस्त करायला हवे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बलाढ्य ब्रिटिशांसाठी लढण्यासाठी गांधींच्या पाठीमागे जनतेची उर्जा होती आणि अशा निराशाजनक वातावरणात ही ऊर्जा नव्याने निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगत डॉ. सतीश व शुभदा यांच्यामुळे मानवतेचा झरा कोणत्या ना कोणत्या रूपात वाहत असतो, याची खात्री पटल्याचे मनोगत व्यक्त केले. विकास झाडे यांनी प्रास्ताविक केले तर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बळवंत मोरघडे यांनी आभार मानले.
यावेळी आदिवासी भागातील गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला.
पत्रकारांना माओवादी समजू नका : बागाईतकर
यावेळी प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतकर म्हणाले, पत्रकार समाजाच्या विसंगतीकडे नजर ठेवून असतो व ती समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सरकारला पत्रकाराचे हे काम विरोधात असल्यासारखे वाटते. मात्र हा विरोध नसून विसंगती दूर होउन समाज सुसंगत व्हावा एवढीच पत्रकाराची अपेक्षा असते, त्यामुळे सुधीरभाऊ पत्रकारांना माओवादी समजू नका, असा टोला त्यांनी लावला. त्यांनी गोगुलवार दाम्पत्याच्या कार्याची प्रशंसाही केली.
वनअधिकारातून होईल वनसंवर्धन
यावेळी सत्काराला उत्तर देताना शुभदा व सतीश गोगुलवार यांनी आदिवासी व वननिवासींना वनाधिकार देण्याची मागणी लावून धरली. वनाधिकार दिल्याने नुकसान होईल, अशी भीती शासन-प्रशासनातर्फे व्यक्त केली जाते. मात्र ही भीती व्यर्थ आहे. अनेक वृक्ष, पक्षी आणि प्राणी हे आदिवासींचे देव आहेत, त्यामुळे वनांचे संवर्धन त्यांच्याशिवाय इतर कुणीही करू शकत नाही, अशी भावना दोघांनीही व्यक्त केली. आदिवासींना माणूस म्हणून व संविधानाने दिलेला नागरिकत्वाचा त्यांचा अधिकार समाजाने स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगत गावातच त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज शुभदा देशमुख यांनी व्यक्त केली. मिळालेल्या पुरस्काराची राशी कुपोषण मुक्तीच्या उपक्रमांसाठी आणि विकलांगांच्या पुनर्वसनासाठी खर्च करणार असल्याचे डॉ. गोगुलवार यांनी यावेळी सांगितले.