नर्सरी, केजीचे लाखो चिमुकले या वर्षीही राहणार घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:32+5:302021-05-26T04:08:32+5:30
नागपूर : कोरोनाचे अनेक वाईट परिणाम पुढे येत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र कोसळल्यागतच झाले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाची पुरती ...
नागपूर : कोरोनाचे अनेक वाईट परिणाम पुढे येत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र कोसळल्यागतच झाले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाची पुरती वाट लागली आहे. नर्सरी व केजीमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील जवळपास लाखावर विद्यार्थी या वर्षीही कोरोनामुळे घरातच राहणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात नर्सरी ते केजीच्या जवळपास हजारावर शाळा आहेत. या शाळांमधून लाखोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. नर्सरी ते केजी-टूपर्यंतचे चिमुकले मागील वर्षी घरातच राहिले. या वर्षी कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे चिमुकले घरातच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी ते केजी शाळा चालविणाऱ्या अनेक संस्था चालकांमध्ये चिंतायुक्त वातावरण पसरले आहे. सर्वांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील नर्सरीच्या शाळा - १,०५८
विद्यार्थी संख्या - १,१८,०००
वर्षभर कुलूप यंदा काय होणार?
- गेल्या वर्षभरापासून शाळा कुलूपबंद आहेत. तिसऱ्या लाटेमुळे येणारे वर्षीही शाळा कुलूपबंदच राहणार आहे. शाळाच बंद असल्याने, आम्ही मुलांची फीही माफ केली, पण शाळेचे मेंटनन्स, शिक्षकांचे वेतन याशिवाय अनेक बाबींवर पैसा खर्च होत असतो. शाळांची देखरेख पैशाअभावी रखडली आहे. कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे.
नीलेश सोनटक्के, प्राचार्य, श्री सत्यसाई विद्या मंदिर व कॉन्व्हेंट
२) मार्च, २०२० पासून नर्सरी केजीच्या शाळा बंद आहे. प्री-प्रायमरी शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे. ऑनलाइन शिक्षण हा पर्याय लहान मुलांच्या बाबतीत शक्य नाही. यामुळे शाळांना फीस नाही. आर्थिक अडचण खूप वाढली आहे. सध्या तरी शिक्षण सुरू होईल हे निश्चित नाही, शिवाय शिक्षकांचा पगार व मेंटेनन्सचा खर्च आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.
कपिल उमाळे, संचालक, राहुल उमाळे कॉन्व्हेंट
३) सलग दोन सत्र शाळा बंद राहणार असल्याने, आमच्या डोळ्यासमोर अंधार दिसत आहे. शाळा चालवायची की बंद करायची, असा प्रश्न आम्हाला भेडसावतो आहे. किती दिवसपर्यंत असे चालणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अतिशय बिकट परिस्थिती आली आहे. काय करावे, हेच कळत नाही.
- रंजना सुरजुसे सोमकुवर, ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंट, खापरी
१) वर्षभरापासून चिमुकले घरातच आहेत. घरात कितीही प्रयत्न केला, तरी मुले शिकत नाहीत. त्यांच्या शैक्षणिक सत्राबाबत थोडीशी चिंता वाटते. वयाने लहान असली, तरी त्यांचा मूलभूत अभ्यासक्रम कच्चा राहू नये, याची आम्हाला काळजी वाटते.
संदीप बन्सोड, पालक
२) लहानग्यांना शिस्त लागावी, म्हणूनच प्री-प्रायमरी शाळेत टाकावे लागते. शाळा त्यांच्याकडून आवश्यक त्या सर्व गोष्टी करूनही घेतात. दीड वर्षांपासून मुले घरातच आहे. शाळा सुरू होईल की नाही, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पुढच्या वर्गात जेव्हा ते जातील, ते कसे शिकतील? अवघडच आहे.
अंजली पाध्ये, पालक
- ही परिस्थिती मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांचे आरोग्य टिकविण्याची आहे. मोठमोठ्या लोकांनाच कोरोनाने घाम फोडला, त्यात लहानग्यांचे काय अस्तित्व आहे. अभ्यास बुडला, तरी चालेल. कोरोना गेल्यानंतरच बघू शिक्षणाचे काय व्हायचे ते.
सुनीता बालपांडे, पालक
- पालक-मुलांमध्ये संवाद वाढवा
दोन ते सहा वर्षे वयोगटांतील मुले अनेकांचे अनुकरण करतात. शाळाच बंद असल्याने ते गेल्या दीड वर्षांपासून घरातच आहे. त्यामुळे त्यांच्या सवयीत अनेक बदल झाले आहे. अशा वेळी पालकांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. ते घरातच असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांचा मुलांसोबत संवाद अधिक वाढविणे गरजेचे आहे.
डॉ.मनिष ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ