महादुला येथील शेतकऱ्याने फुलविली रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:15+5:302021-05-29T04:08:15+5:30

रामटेक : पारंपरिक शेतीतून अधिक उत्पादन शक्य नाही. शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र ...

A nursery planted by a farmer at Mahadula | महादुला येथील शेतकऱ्याने फुलविली रोपवाटिका

महादुला येथील शेतकऱ्याने फुलविली रोपवाटिका

Next

रामटेक : पारंपरिक शेतीतून अधिक उत्पादन शक्य नाही. शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. भाजीपाला पिकाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक लक्षांक देण्यात आला आहे. रामटेक तालुक्यातील महादुला येथे रोशन झाडे यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना सध्या दीड लाख मिरचीच्या रोपांची ऑर्डर मिळाली आहे. रोपे करण्यास सुरुवात झाली आहे. या रोपवाटिकेत मिरचीची गौरी या जातीची ४० हजार रोपे पाच ते सात दिवसांच्या अवस्थेत आहेत. ०.४० हेक्टर क्षेत्रात लाखोचे उत्पादन होणार आहे. यासाठी शेतकऱ्याची निवड शासनाने दिलेल्या निकषानुसार केली जाते. यामध्ये ०.४० हेक्टर जागा मालकीची असणे आवश्यक आहे.

शेडनेट गृह, प्लॉस्टिक टनेल, पावर नॅपसॅक स्पेअर प्लास्टिक क्रेट्स इत्यादी सुविधा असणे आवश्यक आहे. यासाठी एकूण खर्च ४ लाख ६० हजार रुपये येतो. यावर २ लाख ३० हजार रुपये इतके शासकीय अनुदान मिळणार आहे. शेतीपुरक व्यवसायात संधी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर व पीक रचनेत बदल, आर्थिक उत्पन्न व भाजीपाला पिकाच्या उत्पादनात वाढ ही उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना आणली आहे. तरुण शेतकरी सध्या नवीन तंत्रज्ञानाची कास धरत आहेत, हे चांगले संकेत आहेत. तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी या रोपवाटिकेला भेट दिली व शेतकऱ्याला मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी गजबे, पर्यवेक्षक मेनकुदळे उपस्थित होते. रामटेक तालुक्यात आणखी दोन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अनु. जाती व खुल्या गटातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.

-

रोपवाटिकेची पाहणी करताना कृषी अधिकारी स्वप्नील माने व इतर कर्मचारी.

Web Title: A nursery planted by a farmer at Mahadula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.