परिचारिकांची आंदोलनाची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:41+5:302021-06-18T04:06:41+5:30
नागपूर : पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. सुरुवातीचे ...
नागपूर : पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. सुरुवातीचे दोन दिवस दोन तास कामबंद, नंतरचे दोन दिवस पूर्ण दिवस कामबंद केले जाणार आहे. या दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर, २५ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या फार कमी आहे. यामुळे परिचारिकांवर कामाचा ताण पडला आहे. नागपूर संघटनेचे उपाध्यक्ष शहजाद बाबा खान म्हणाले, वेळेवर रिक्त पदे न भरल्यामुळे व रुग्णालयाचा विकास होताना परिचारिकांची संख्या न वाढविल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. शासनाने कोरोनाच्या काळात कंत्राटी पद्धतीने तात्पुरती सोय म्हणून तुटपुंज्या पगारात परिचारिकांची भरती केली. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच या परिचारिकांना काढले जाते, तसेच कमी वेतन व जीवाच्या भीतीने अनेक परिचारिका रुजूही होत नाहीत किंवा सोडूनही जातात. यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी तातडीने रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक परिचारिकेला पदोन्नतीचा हक्क आहे. परंतु त्याकडेही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. केंद्र सरकारच्या परिचारिकांना कोविड भत्ता दिला जातो. परंतु राज्यातील परिचारिकांना हा भत्ता मिळत नाही. हा दुजाभाव थांबायला हवा. केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता देण्याची मागणी आहे. त्याचबरोबर कोरोना काळात सात दिवस काम आणि तीन दिवस सुटी द्यावी. शिल्लक रजेच्या प्रश्नांसह इतरही मागण्यांना घेऊन हे आंदोलन केले जात आहे.