परिचारिका, कर्मचाऱ्यांनी काम बंद करून केले आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:44+5:302021-07-11T04:07:44+5:30
नागपूर : कर्मचाऱ्यांवर अन्याय आणि शोषण करण्यात येत असल्याचा आरोप लावून एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता ...
नागपूर : कर्मचाऱ्यांवर अन्याय आणि शोषण करण्यात येत असल्याचा आरोप लावून एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील २०० पेक्षा अधिक परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी काम बंद करून आंदोलन केले. कास्ट्राईब नर्सेस संघटनेतर्फे कामगार नेता अरुण गाडे यांच्या नेतृत्वात शनिवारी हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन काम बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
आंदोलनात परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी ५ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना स्थायी करावे, वार्षिक वेतनवाढ द्यावी, सुट्या, समान काम समान वेतन लागू करावे, संघटनेच्या महिला नेत्यांची बदली त्वरित रद्द करावी यासह इतर मागण्या केल्या आहेत. आंदोलनादरम्यान हंगामा झाल्यामुळे पोलिसांना तैनात करण्यात आले. कामगार नेता अरुण गाडे यांनी सांगितले की, ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत कायम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आठ वर्ष उलटून गेल्यानंतरही कमी वेतन देऊन कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यात येत आहे. शासनाकडून वेतनाशिवाय इतर सुविधा असतानाही कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. वार्षिक वेतनवाढ देण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्याही मिळत नाहीत. सुटी घेतल्यास वेतनातून पैसे कपात करण्यात येत आहेत. बारा तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अपमान सहन करावा लागत आहे. त्यांच्यावर मानसिक अत्याचार होत आहे. शासनाचे नियम सर्व व्यवस्थापनांना अनिवार्य आहेत. परंतु रुग्णालयात तानाशाही सुरु असून कायदा व सुरक्षा रक्षकांसोबत मिळून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाचे हे कृत्य निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गजानन थुल, सीताराम राठोड, कृष्णा मसराम उपस्थित होते.
...............
पूर्वीच केल्या मागण्या पूर्ण
‘रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या यापूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. काही कर्मचारी युनियनच्या नेत्यांच्या दबावात येऊन चुकीच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. मानसिक अत्याचार आर्थिक शोषणाचा करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे.’
-डॉ. विकास धानोरकर, संचालक, लता मंगेशकर रुग्णालय
...........