परिचारिकांना बदलावे लागते वजनदार सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:22+5:302021-09-21T04:09:22+5:30
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे वॉर्डांच्या समस्या वाढत आहेत. बालरुग्ण वॉर्ड क्रमांक १ ...
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे वॉर्डांच्या समस्या वाढत आहेत. बालरुग्ण वॉर्ड क्रमांक १ आणि २ मध्ये स्थिती चिंताजनक झाली आहे. येथे चतुर्थश्रेणी कर्मचारी नसल्यामुळे परिचारिकांना वजनदार जम्बो सिलिंडर बदलावे लागत आहे. यामुळे परिचारिका त्रस्त झाल्या आहेत. त्यांना आयसीयू सोडून सिलिंडर संपल्यास ते बदलण्यासाठी जावे लागत असून, यामुळे बालरुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक १ मध्ये नवजात बालकांना ठेवण्यात येते. वॉर्ड क्रमांक २ मध्येही लहान मुलांना ठेवण्यात येते. येथे आयसीयू वॉर्डही आहे. या वॉर्डाच्या दारावरच सिलिंडर शिफ्ट करण्यात आले आहेत. अशास्थितीत येथे काही दुर्घटना झाल्यास बाहेर निघणे कठीण होणार आहे. जम्बो सिलिंडर खूप वजनदार असते. त्याला दर दोन तासांनी बदलावे लागते. सिलिंडर संपल्यास ते बदलण्यासाठी पुरुष कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु कर्मचारीच नसल्यामुळे हे काम परिचारिकांना करावे लागत आहे. त्यांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नागपूर सचिव पल्लवी चौधरी यांनी सांगितले की, अनेक दिवसापासून येथे ही समस्या आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला निवेदन देऊन यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु समस्येवर काहीच तोडगा काढण्यात आला नाही. सध्या चिंताजनक स्थिती असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
...................