मेयो, मेडिकलमधील परिचारिका संपावर; २ हजार खाटांच्या तुलनेत १३१ नर्चस कामावर, रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 11:47 AM2022-05-27T11:47:31+5:302022-05-27T11:50:53+5:30
शासकीय रुग्णालयाचा कणा असलेल्या परिचारिकाच संपावर गेल्याने गुरुवारी मेयो, मेडिकलची रुग्णसेवाच सलाईनवर आली आहे.
नागपूर : ‘ब्रेन हॅमरेज’च्या ६० वर्षीय रुग्णाची सलाईन संपली. यामुळे उलट दिशेने रक्त वाहू लागले. बेडवरची चादर रक्ताने माखली. नातेवाईक नर्स... नर्स... म्हणून ओरडायला लागले. परंतु वॉर्डात नर्सच नव्हती. अखेर एक इंटर्न डॉक्टरने गंभीर रुग्णाला सोडून त्या रुग्णाकडे धाव घेतली आणि सलाईन बंद केली. वॉर्ड क्र. ३६ मधील आज सकाळचा हा प्रकार आहे. गुरुवारपासून परिचारिका संपावर गेल्याने मेयो, मेडिकलची रुग्णसेवाच सलाईनवर आली आहे.
परिचारिकांचे ‘आऊटसोर्सिंग’ करू नका, त्यांची कायमस्वरूपी भरती करा व केंद्राप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागणीला घेऊन २३ मेपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यात आंदोलन सुरू आहे. पहिले तीन दिवस एका तासासाठी काम बंद आंदोलन केले. परंतु सरकार लक्ष देत नसल्याचे पाहत, गुरुवार, २६ मे रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. मेयोच्या तुलनेत मेडिकलने याला गंभीरतेने घेतले नाही. यामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे.
-दुपार झाली परंतु दुसरे सलाईन लावलेच नाही
सात महिन्याच्या चिमुकलीच्या आईने सांगितले, सकाळी ७.३० वाजता सलाईन संपल्याने एका नर्सने ती बंद करून निघून गेली. त्यानंतर दुसरी सलाईन लावण्यासाठी कुणी आलेच नाही. डॉक्टरांना सांगितल्यावर थांबा येतो, पाहतो, असेच उत्तर मिळाले. दुपारचे २ वाजले तरी सलाईन लावले नसल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी केला.
-गंभीर रुग्णांचे नातेवाईक चिंतेत
रुग्णाची नोंदणी करण्यापासून ते रुग्णांचे बेड तयार करणे, डॉक्टरांनी सांगितलेले औषध, इंजेक्शन देणे, वॉर्डातील सफाईकडे लक्ष ठेवणे, रुग्णांच्या नाश्ता व जेवणाची सोय करण्याची जबाबदारी नर्सेसवर असते. परंतु त्या संपावर गेल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. विशेषत: गंभीर रुग्णांचे नातेवाईक चिंतेत आहेत. काही रुग्णांचे नातेवाईक रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी मेडिकलमधून स्वत:हून सुटी घेऊन खासगी रुग्णालयात जाण्याच्या तयारी आहेत.
-मेडिकलमध्ये प्रत्यक्षात आठ नर्सेस रुग्णसेवेत
मेडिकलमध्ये जवळपास दोन हजार खाटा आहेत. त्यातुलनेत परिचारिकांच्या मंजूर पदांची संख्या १०७१ आहे. यातील २०० पदे रिक्त आहेत. १२३ परिचारिका विविध कारणाने सुटीवर आहेत. ६१७ परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी आहेत. यामुळे तीन पाळीतील कामाची जबाबदारी १३१ परिचारिकांवर आली आहे. यातही महाअधिसेविका, अधिसेविका व सहायक अधिसेविका या प्रत्यक्ष काम करीत नसल्याने, सकाळ व दुपारच्या पाळीत आठ नर्सेसच प्रत्यक्ष कामावर होत्या.
-आरोग्य विभागानेही केले हात वर
मेडिकलमध्ये जनरल नर्सिंग बंद करण्यात आले आहे. बीएस्सी नर्सिंग सुरू असून, येथील विद्यार्थिनी उन्हाळी सुट्यांवर गेल्या आहेत. यामुळे मेडिकलची स्थिती बिकट झाली आहे. आरोग्य विभागातील नर्सेसही या संपात सहभागी होण्याची शक्यता असल्याने, त्यांनीही आपल्या परिचारिका देण्यासाठी हात वर केले आहेत.
-केवळ आयसीयू, कॅज्युअल्टीमध्येच नर्स
मेडिकलमध्ये सद्यस्थितीत कामावर १३१ नर्सेस आहेत. यामुळे केवळ आयसीयू, मेडिसीन व सर्जरी कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नर्सची ड्युटी लावणे शक्य आहे. इतर ठिकाणी व वॉर्डात इंटर्न डॉक्टरांपासून ते नॉन क्लिनिकल विषयातील निवासी डॉक्टरांवर वॉर्डांची जबाबदारी दिली आहे.
-डॉ. उदय नार्लावार, उपअधिष्ठाता मेडिकल