जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी संपावर; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 07:00 AM2023-03-14T07:00:00+5:302023-03-14T07:00:16+5:30
Nagpur News जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या ३४ शाखांसह आजपासून बेमुदत संपावर जात आहे.
नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या ३४ शाखांसह आजपासून बेमुदत संपावर जात आहे. त्यांच्यासोबत तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही असल्याने रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून मेयो, मेडिकलने नर्सिंग विद्यार्थी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेणार असले तरी दोन्ही रुग्णालयाने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने सोमवारी मेडिकलच्या नर्सिंग प्रवेशद्वारावर बैठक घेऊन मंगळवारपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाची माहिती दिली. यावेळी नागपूर शाखेच्या अध्यक्षा संयोगिता महेशगवळी, सहसचिव जयश्री सरथ व जुल्फी अली उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना संघटनेचे सहसचिव जुल्फी अली यांनी सांगितले, मेडिकलमधील जवळपास ७०० ते ८०० तर मेयोमधील ३०० वर परिचारिका या संपात सहभागी होतील. या शिवाय, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे. या संदर्भातील माहिती अधिष्ठाता यांना देण्यात आली आहे. यात रुग्णांची गैरसोय झाल्यास याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची राहील, असेही अली यांनी सांगितले.
- १५० नर्सिंग विद्यार्थ्यांची घेणार मदत
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले, मंगळवारपासून परिचारिका संपावर जाणार असल्याने मेडिकलच्या बीएससी नर्सिंग कॉलेजच्या १५० विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. संप लांबल्यास काही खासगी नर्सिंग कॉलेजचीही मदत घेतली जाईल. तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ कर्मचारी संपावर जाणार असल्याने कंत्राटी तत्त्वावर असलेल्या १६५ कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या कॉलेज कौन्सिलमध्ये या संपाची माहिती देण्यात आली. यात ओपीडी, इमर्जन्सी उपचार व शस्त्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत ठेवण्यावर चर्चा झाली. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाईल, असेही डॉ. कुचेवार म्हणाले.
- केवळ इमर्जन्सी शस्त्रक्रिया
मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सी.एम. बोकडे यांनी सांगितले, संपात सहभागी होणाऱ्या दोनपैकी एकाच संघटनेने पत्र दिले आहे. यामुळे दुसऱ्या संघटनेच्या परिचारिकांची मदत होईल. त्यांच्यासोबतीला नर्सिंग कॉलेजच्या २५ ते ३० विद्यार्थिनी असतील. १६५ कंत्राटी कर्मचारी मदतीला असणार आहेत. त्यांच्या कामाचे आजच नियोजन करण्यात आले. निवासी डॉक्टर व इंटर्न डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे. रुग्णसेवा सुरळीत चालविण्यासाठी केवळ इमर्जन्सी सेवा आम्ही देणार आहोत.