उद्यापासून काळ्या फिती लावून देतील परिचारिका सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 07:01 PM2022-11-25T19:01:42+5:302022-11-25T19:03:21+5:30

Nagpur News सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य मनिषा शिंंदे यांच्या केलेल्या बेकायदेशीर बदलीचा निषेध म्हणून परिचारिका संघटनेने उद्या शुक्रवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Nurses will wear black ribbons from tomorrow | उद्यापासून काळ्या फिती लावून देतील परिचारिका सेवा

उद्यापासून काळ्या फिती लावून देतील परिचारिका सेवा

Next
ठळक मुद्देराज्य अध्यक्षांच्या बेकायदेशीर बदलीचा निषेध३० नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

नागपूर : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्याध्यक्ष व सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य मनिषा शिंंदे यांच्या केलेल्या बेकायदेशीर बदलीचा निषेध म्हणून परिचारिका संघटनेने उद्या शुक्रवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने प्रशासन व शासनस्तरावर गेल्या काही वर्षांपासून सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालय व पुणे येथील ससून सर्वाेपचार रुग्णालय येथील अधिसेविकेच्या मनमानी कारभाराबाबत लेखी व तोंडी तक्रार करून कारवाईची विनंती केली होती. परंतु त्यांच्यावर कारवाई न करता मनिषा शिंदे यांच्या प्रशासकीय बदलीचे आदेश काढण्यात आले. याचा निषेध म्हणून राज्य परिचारिका संघटनेने आंदोलन उभारले. २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान परिचारिका काळ्या फिती लावून रुग्णसेवा देतील. त्यानंतरही बदलीचे आदेश मागे घेण्यात आले नाही तर २९ नोव्हेंबरला एकदिवसीय संप पुकारतील. त्यानंतरही जैसे थे स्थिती राहिल्यास ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संप केला जाईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शहजाद बाबा खान यांनी दिली.

नोव्हेंबर महिन्यात प्रशासकीय बदली कशी ?

शहजाद बाबा खान म्हणाले, मनिषा शिंंदे यांची केलेली बदलीमागे प्रशासकीय कारण देण्यात आले. परंतु प्रशासकीय बदल्या या फेब्रुवारी ते जून महिन्यात होतात. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली प्रशासकीय बदली बेकायदेशीर व हेतूपुरस्पर आहे. याचा निषेध म्हणून संपाचा इशारा देण्यात आला आहे. याचा विपरित परिणाम रुग्णसेवेवर झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही बाबा खान म्हणाले.

Web Title: Nurses will wear black ribbons from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप